जगभरामध्ये करोनाच्या साथीने थैमान घातलेलं असतानाच आता जगासमोर एक नवीन संकट उभं राहिलं आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये घातक अशा मारबर्ग विषाणूचा संसर्ग झालेला पाहिला रुग्ण आढळून आला आहे. जागितक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओने यासंदर्भातील माहिती दिली आहे. हा विषाणू इबोला आणि करोनापेक्षाही अधिक घातक असल्याचं मानलं जात आहे. या विषाणूचा संसर्ग प्राण्यांमधून मानवामध्ये होऊ शकतो. मारबर्गचा रुग्ण आढळून आल्याने गिनीमधील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या विषाणूचा संसर्ग वटवाघळांच्या माध्यमातून होते. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मरण पावण्याचं प्रमाण हे ८८ टक्के इतकं आहे. २ ऑगस्ट रोजी दक्षीण गुएकेडॉ प्रांतामध्ये एका रुग्णाचा या विषाणूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृत्यनंतर केलेल्या चाचण्यांमध्ये त्याच्या शरीरात हा विषाणू आढळून आला. शवविच्छेदन अहवालामध्ये या व्यक्तीच्या शरीरात इबोलाचा विषाणू आढळून आला नसल्याचं उल्लेख आहे. इबोलाऐवजी या व्यक्तीच्या शरीरात मारबर्ग विषाणू आढळून आल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

आफ्रीकेमधील जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रीय निर्देशक डॉक्टर मात्शिदिसो मोएती यांनी यासंदर्भातील माहिती दिलीय. “मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला ततडीच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे,” असं मोएती म्हणाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने गिनीमधून इबोलाचं समूळ उच्चाटन झाल्याची घोषणा केली होती. मात्र आता मारबर्ग विषाणूच्या संसर्गाचे वृत्त समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. मागील वर्षी करोनासोबतच येथे इबोलाचीही साथ पसरली होती. या साथीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने येथे विशेष मोहीम राबवली होती. मारबर्ग विषाणूच्या संसर्गाचा धोका क्षेत्रीय स्तरावर अधिक असून जागतिक स्तरासंदर्भात धोका कमी असला तरी खबरदारीचा इशारा देण्यात आलेला आहे.

“आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांसोबत काम करतोय. ज्यांनी इबोलाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्यक्षात फिल्डवर उतरुन काम केलं आहे त्यांना अनुभव असल्याने त्यांचा फायदा होईल. तसेच तज्ज्ञांची आम्ही मदत घेत असून विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत,” असं मोएती म्हणाले आहेत. गिनी सरकारनेही यासंदर्भात एक पत्रक काढून मारबर्गचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मारबर्गचा संसर्ग झाल्यानंतर शरीरामधून उत्सर्जित होणारे पदार्थ हे बाहेरील प्रदुषित वातावरण आणि इतर गोष्टींच्या संपर्कात येतात आणि रुग्णाची प्रकृती त्यामुळे अजून खालावते. तसेच यामुळे रुग्णावर योग्य पद्धतीने उपचारही करता येत नाहीत.