वायुसेनेत पहिल्यांदाच लढाऊ विमानांसाठी महिला पायलट म्हणून रुजू होण्याच्या तयारीत असलेल्या तीन प्रशिक्षणार्थींना कमीत कमी चार वर्षांपर्यंत मातृत्व न स्वीकारण्याचा सल्ला भारतीय वायुसेनेतर्फे देण्यात आला आहे. भावना कांत, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या तीन प्रशिक्षणार्थी महिलांना जून महिन्यांत फायटर पायलट म्हणून भारतीय वायुसेनेत सहभागी करून घेण्यात येईल. मातृत्वाबाबतचा हा बंधनकारक असा नियम नसल्याचे वायुसेनेतर्फे सांगण्यात आले. त्यांच्या प्रशिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या प्रशिक्षणार्थींना मातृत्व टाळण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती वायुसेनेचे व्हाईस एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांनी दिली.
जून महिन्यात प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात या तीनही महिलांना लढाऊ विमान चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. वायुसेनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमानुसार फायटर पायलटसाठी पाच वर्षांचे विनाअडथळा नियमित प्रशिक्षण आवश्यक आहे. या महिला प्रशिक्षणार्थींचे जवळजवळ एक वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण होत आले आहे. तीनही महिलांनी अलीकडेच दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण केले असून, जून २०१६ ला कर्नाटकमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी त्या रवाना होतील. या प्रशिक्षणादरम्यान त्या ब्रिटिश हॉक विमाने चालवतील. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या सुपरसॉनिक लढाऊ विमाने चालवतील.