पीटीआय, शेवपूर

मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यामधील खुल्या पिंजऱ्यामध्ये असलेली मादी चित्ता गामिनी आणि तिचे चार बछडे यांना सोमवारी मोकळ्या जंगलात सोडण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे आता कुनो अभयारण्याच्या मोकळ्या जंगलातील चित्त्यांची संख्या १७ इतकी झाली आहे. तर नऊ चित्ते अजूनही खुल्या पिंजऱ्यामध्ये आहेत. यापैकी १४ बछड्यांचा जन्म भारतात झाला आहे.

गामिनी ही आफ्रिकेहून आणलेली मादी आहे. तिच्याबरोबर मोकळे सोडण्यात आलेल्या चार बछड्यांमध्ये दोन नर आणि दोन मादींचा समावेश आहे. हे सर्व बछडे वय १२ महिने इतके आहे. गामिनीने १० मार्च २०२४ रोजी सहा बछड्यांना जन्म दिला होता. त्यापैकी दोन बछड्यांचा मृत्यू झाला होता. गामिनी आणि तिच्या बछड्यांना खजुरी जंगल भागात सोडल्याची माहिती वन खात्याचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक उत्तम कुमार शर्मा यांनी दिली.

पर्यटकांना चित्ते पाहण्याची संधी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी रविवारी रात्री ‘एक्स’वर एक पोस्ट लिहून आशा व्यक्त केली की, चित्त्यांची संख्या वाढल्यामुळे पर्यटकांना आता त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी मिळेल.

Story img Loader