पीटीआय, नवी दिल्ली: ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने माजी रेल्वेमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मंगळवारी दोन सत्रांत सुमारे पाच तास चौकशी केली. लालूप्रसाद यांच्या रेल्वेमंत्रिपदाच्या २००४ ते २००९ या कार्यकाळात त्यांच्या कुटुंबीयांना कथितरित्या जमीन भेट किंवा विक्रीच्या बदल्यात संबंधितांना रेल्वेत नोकऱ्या देण्यात आल्याचा आरोप आहे.
गेल्या वर्षी सिंगापूरमध्ये मूत्रिपड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यापासून लालूप्रसाद यादव हे कन्या मिसा भारती यांच्या ‘इंडिया गेट’जवळील पंडारा पार्क येथील निवासस्थानी वास्तव्यास आहेत. ‘सीबीआय’च्या पाच अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी सकाळी १०. ४० वाजता तिथे दाखल झाले आणि लालूप्रसाद यादव यांची चौकशी केली. दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी या पथकाने भोजनासाठी चौकशी थांबवली. त्यानंतर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पुन्हा चौकशी सुरू झाली. ती सव्वापाचपर्यंत चालली.
‘सीबीआय’ने लालूप्रसाद यांच्या पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवींची त्यांच्या पाटण्यातील निवासस्थानी सोमवारी पाच तास चौकशी केली होती. ‘सीबीआय’ने लालूप्रसाद, राबडी देवी आणि इतर १४ जणांविरुद्ध गुन्हेगारी कट व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींखाली आरोपपत्र दाखल केले आहे. सर्व आरोपींना १५ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे ‘समन्स’ बजावण्यात आले आहे. या प्रकरणी कथितरित्या झालेले आर्थिक गैरव्यवहार आणि व्यापक कट उघड करण्याचा प्रयत्न करत असल्याचा ‘सीबीआय’चा दावा आहे.
कुटुंबीयांची भाजपवर टीका
‘‘आमच्या कुटुंबाने भाजपला सातत्याने विरोध केल्याने ही कारवाई केली जात आहे. भाजप विरोधकांवर ‘सीबीआय’ कारवाई करते आणि त्यांच्याशी जुळवून घेणाऱ्यांना मदत करते, हे उघड गुपित आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी व्यक्त केली. लालूप्रसाद यांच्या सिंगापूरस्थित कन्या रोहिणी आचार्य यांनी ‘सीबीआय’च्या कारवाईबद्दल ‘ट्विटर’वरून संताप व्यक्त केला. छळामुळे वडिलांची प्रकृती बिघडली तर आम्ही सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडू’’, असा इशारा रोहिणी यांनी दिला.
सिसोदियांची चौकशी, विजयन यांचे पंतप्रधानांना पत्र
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची सुमारे पाच तास चौकशी केली. दरम्यान, सिसोदिया यांच्यावरील अटकेची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होती. ती टाळायला हवी होती, असे नमूद करत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.