Sri Lankan Navy firing: डेल्फ्ट बेटाजवळ भारतीय मच्छिमारांवर श्रीलंकन नौदलाने गोळीबार केला असून त्यात पाच मच्छिमार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पराराष्ट्र विभागाने श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना बोलावून घेतले आणि गोळीबाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्त हे श्रीलंकेच्या परराष्ट्र विभागाशी संवाद साधून हा विषय उचलणार आहेत, असेही भारतीय परराष्ट्र विभागाने सांगितले.
पुद्दुचेरी येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील १३ मच्छिमारांना अटक करत असताना गोळीबार करण्यात आला. त्यापैकी पाच जण जखमी असून दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना जाफना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर तिघांवर किरकोळ उपचार करण्यात आले आहेत. इतर मच्छिमारांना अटक झाली आहे.
जाफना येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली असून मच्छिमारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमी मच्छिमारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही सांगितले गेले आहे.
भारतीय मच्छिमारांनी मासेमारीसाठी चुकून आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडल्यानंतर डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने मच्छिमारांना ताब्यात घेतले. याशिवाय मच्छिमारांची बोटही नौदलाने जप्त केली, अशी बातमी पीटीआयने दिली आहे.
पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी एका निवेदनाद्वारे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती केली आहे की, त्यांनी श्रीलंकेच्या सरकारशी समन्वय साधून सर्वच्या सर्व मच्छिमारांना सोडवून आणण्याची भूमिका घ्यावी. रंगास्वामी यांनी पुढे म्हटले की, १३ मच्छिमारांपैकी सहा जण हे पुद्दुचेरीच्या कराइकल येथील असून सात जण तामिळनाडूमधील आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, या घटनेनंतर भारताने तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारत सरकारने मच्छिमारांशी संबंधित मानवी समस्यांना मानवतावादी दृष्टीकोनातून सोडविण्याची गरज व्यक्त केली आहे. यामध्ये उपजीविकेशी संबंधित बाबींचाही विचार केला गेला आहे. मच्छिमारांविरोधात कोणत्याही परिस्थितीत बळाचा वापर योग्य नाही.
© IE Online Media Services (P) Ltd