जाट समुदाय आक्रमकच; हरयाणातील पाच शहरांमध्ये संचारबंदी; जनजीवन विस्कळीत; लोण दिल्लीपर्यंत पोहोचले
आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समुदायाने सुरू केलेले आंदोलन आता चिघळले असून आंदोलनाचे लोण उत्तर भारतात पसरू लागले आहे. हरयाणातील पाच शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून दोन दिवसांत सात जण या आंदोलनाचे बळी ठरले आहेत. या आंदोलनामुळे हरयाणातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात आतापर्यंत सात जण ठार झाले असून ७५ जण जखमी झाले आहेत.
जाट समुदायाचा आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून हरयाणात जाटांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर आंदोलनाचे लोण पसरत गेले. शनिवारीही आंदोलकांनी ठिकठिकाणी सरकारविरोधात घोषणा देत हिंसेचा मार्ग अवलंबला. हरयाणाचे मंत्री ओमप्रकाश धनकार यांच्या घरावर आंदोलकांनी दगडफेक केली. तर अनेक ठिकाणी बस, खासगी वाहने, रिक्षा, सरकारी-निमसरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, दुकाने आदी जाळण्यात आली. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या पुतळ्याचेही अनेक ठिकाणी दहन करण्यात आले. हरयाणातील सोनिपत, गोहाना, रोहतक, भिवानी आणि झज्जर या पाच शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लष्कराला शुक्रवारीच पाचारण करण्यात आले आहे. मात्र, लष्कराच्या गाडय़ांचा मार्गही आंदोलकांनी रोखून धरला. अखेरीस लष्कराच्या जवानांना हवाईमार्गाने वरील ठिकाणे गाठावी लागली. दरम्यान,आंदोलनाचे लोण दिल्लीत पसरले असून दिल्ली विद्यापीठात विद्यार्थ्यांनी जाट आरक्षणासाठी नॉर्थ कॅम्पस भागात निदर्शने केली. भाजप सरकारविरोधात ही निदर्शने असल्याचे विद्यार्थी नेत्यांनी सांगितले. या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.

दीडशे रेल्वेगाडय़ा रद्द
रोहतक, झज्जर, हंसी व इतर भागात खासगी मालमत्तांचे नुकसान करण्यात आले. हिस्सार व रोहतक जिल्ह्य़ात दोन टोल नाक्यांवर हल्ला करण्यात आला. गुरगाव जिल्ह्य़ात आंदोलकांनी रेल्वे मार्ग रोखला. दीडशे रेल्वेगाडय़ा आंदोलनामुळे रद्द करण्यात आल्या.

काँग्रेसचा आरोप
हरयाणात भाजप जातीय आधारावर फूट पाडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जाटांच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधले. तर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

जाट बांधवांनी हिंसेचा मार्ग सोडून चर्चेने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. सरकार जाटांच्या आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार आहे.
– मनोहरलाल खट्टर, हरयाणाचे मुख्यमंत्री

Story img Loader