Raped In Indore: देशभरात एकामागोमाग महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कोलकाता आणि बदलापूरमधील घटनांमुळे सगळीकडे संतापाचे वातावरण असताना मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही तब्बल १९ दिवस पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपी भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेसने केल्यामुळे राजकारणही पेटले आहे. उच्च न्यायालयाने ९० दिवसांत या तक्रारीवर कार्यवाही करावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री एफआयआर घेत पाच जणांवर गुन्हा दाखल केला.
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, ११ जून रोजी तिला काही गुंडानी बळजबरीने गाडीत टाकून एका गोदामात नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच टीव्हीवर अश्लील व्हि़डीओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला. आरोपींनी यापुढे जाऊन पीडित महिलेला पट्ट्याने मारहाण केली आणि विवस्त्र करत तिला नृत्य करण्यास भाग पाडले. पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर महिलेने मध्यप्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस सहआयुक्त अभिनय विश्वकर्मा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
“आम्ही घटनेची चौकशी करून पुराव्याच्या आधारावर आरोपींवर कायदेशीर कारवाई करणार आहोत”, अशी माहिती पोलिसांनी दिली. यावेळी त्यांनी आरोपींची नावे उघड करण्यास नकार दिला.
पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर सदर महिलेने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने पोलिसांना आदेश देऊन एफआयआर दाखल करण्यास सांगितले. तसेच ९० दिवसांच्या आत तक्रार निकाली काढावी, असेही आदेश दिले. या आदेशानंतरही पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास १९ दिवसांचा वेळ लावला.
आरोपी भाजपाशी संबंधित?
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निलभ शुक्ला यांनी भाजपावर टीका केली. भाजपाचा पोलिसांवर दबाव असल्यामुळेच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, असा आरोप त्यांनी केला. पाच आरोपींपैकी एक आरोपी भाजपाशी संबंधित आहे, असा आरोप शुक्ला यांनी केला. यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले.
पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर खटले दाखल केले आहेत, अशी माहिती या प्रकरणात मिळत आहे, असे प्रत्युत्तर सलुजा यांनी दिले.