पेशावरच्या आजूबाजूच्या भागात एका घरात लपून बसलेले दहशतवादी व पाकिस्तानी सुरक्षा दले यांच्यात झालेल्या तुंबळ धुमश्चक्रीत सहा जण ठार झाले. त्यात पाच दहशतवादी व एका पोलिसाचा समावेश आहे. दरम्यान तालिबानने हवाई दलाचा तळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
पेशावर येथे पावका उपनगरात झालेल्या या जोरदार चकमकीत पाच दहशतवादी व एक पोलीस ठार झाला. तीन दहशतवाद्यांना लष्करी दले व पोलिसांनी गोळ्या घातल्या तर दोन दहशतवादी आत्मघाती हल्ल्यात ठार झाले, सैनिकांनी घेरल्यानंतर या दोघांनी स्वत:ला उडवून दिले.
या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले आहेत. पेशावर येथील हवाई तळावर काल रात्री हल्ला करणाऱ्या गटातीलच हे दहशतवादी होते असा अंदाज आहे.
पावका येथील रहिवाशांना सकाळी साडेसात वाजता या दहशतवाद्यांनी तेथील एका घरात आश्रय घेतल्याचे समजले. आम्हाला मोटार द्या व पोलिसांना कळवलेत तर खबरदार, अशी धमकी त्यांनी नागरिकांना दिली होती. तरीही स्थानिक रहिवाशांनी धाडसाने खबर दिल्यानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा घातला व परिसराची पूर्ण नाकेबंदी केली.
दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आलेल्या ध्वनिचित्रफितीत सुरक्षा दलांचे जवान चिलखती गाडय़ांसह घटनास्थळाकडे कूच करताना दिसत होते. काल दहशतवाद्यांनी विमानतळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तेथे सुरक्षा दलांनी वेढा देताच ते पळाले, त्यामुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा दिलेला होता असे खैबर पख्तुनवालाचे माहिती मंत्री मियॉ इप्तिकार यांनी सांगितले. तेहरीक ए तालिबान या संघटनेने बाच्छा खान विमानतळावर काल रात्री केलेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दहशतवाद्यांनी विमानतळावर पाच अग्निबाण टाकले व त्यावेळी चार नागरिक व पाच दहशतवादी धुमश्चक्रीत मारले गेले. विमानतळ परिसरातील एकूण ४० रहिवासी यात जखमी झाले आहेत.