Five Nepalese pilgrims returning from the Maha Kumbh Mela killed in road Accident : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यावरून परतणाऱ्या नेपाळमधील पाच भाविकांचा बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. बाईकवर स्टंट करत असलेल्या व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात या भाविकांची गाडी रस्ता दुभाजकाला धडकून पाच वेळा पलटली. शनिवारी झालेल्या या अघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेले प्रवासी आणि मृत्युमुखी पडलेले प्रवासी हे एकाच कुटुंबातील आहेत. तसेच हे सर्व जण जनकपुरी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या अपघाताबद्दल प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार. दुचाकीस्वार हा मधुबनी येथील चार पदरी बायपास महामार्गावर त्याच्या बाईकवर स्टंट करत होता. याचवेळी बाजूने नेपाळमधील भाविकांची स्कॉर्पिओ गाडी देखील वेगाने जात होती. अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेनंतर थांबण्याच्या आधी या एसयूव्ही कारने पाच वेळा पलटी घेतली.
पाच जणांचा जागेवरच मृत्यू
अपघात झाल्यानंतर दुचाकी चालक घटना स्थळावरून पळून गेला. या अपघातात तीन महिला आणि दोन पुरुष जागेवरच ठार झाले तर इतर चार जणांना उपचारासाठी मुजफ्फरपुर येथील श्री कृष्ण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी चालक बऱ्याचदा बायपासवर स्टंट करत असतात, यामुळे सतत अपघात होतात. मात्र अशा घटना टाळण्यासाठी पोलीस कोणतेही प्रयत्न करत नाहीत.
मृतांमध्ये अर्चना ठाकूर, इंदू देवी, मंतरणी देवी, बाळकृष्ण झा आणि कार चालकाचा समावेश आहे. तर मनोहर ठाकूर, श्रृष्टी ठाकूर, कामिनी झा आणि देवतरण देवी हे जखमी झाले आहेत.