Mumbai Tourists Beaten In Goa : जगभरातील लोकप्रिय पर्टनस्थळांपैकी एक असलेले गोवा, गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सनी यंदा पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असून, गोव्यातील रस्ते, हॉटेल्स ओस पडल्याच्या पोस्ट केल्या होत्या. याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील सर्व हॉटेल्स फुल्ल असल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिली होते. अशात उत्तर गोव्यात शुक्रवारी पहाटे समुद्रकिनाऱ्यावरील शॅकच्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या भांडणात मुंबईतील पर्यटकांना मारहाण झाली आहे. यामध्ये एक पर्यटक जखमी झाला आहे. यानंतर पोलिसांनी पाच आरोपी शॅक कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
कळंगुट समुद्रकिनारी प्लॅनेट गोवा बीच शॅकसमोर शुक्रवारी पहाटे ३.३० च्या सुमारास ही घटना घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर शॅकच्या सहा कर्मचाऱ्यांनी आपल्या मित्रांना मारहाण केल्याचा आरोप, एकाने केला आहे.
पर्यटकाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “शॅकच्या सहा कर्मचाऱ्यांनी आधी एका मित्राला कानशीलात लगावत लाथांनी माराहाण केली. तर, दुसऱ्या मित्राच्या डोक्यात काठीने मारले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे.” दरम्यान, जखमी पर्यटकाला उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी एका निवेदनात सांगितले की, “या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, घटना कशामुळे घडली आणि हल्ल्यामागील हेतू काय होता याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी शॅकमध्ये सुरक्षारक्षक आणि आणि वेटर म्हणून काम करतात. पर्यटकांना मारहाण झाल्यानंतर शॅक बंद करण्यात आला होता.”
हे ही वाचा : Sourav Ganguly : सौरव गांगुलीची मुलगी थोडक्यात बचावली, सना गांगुलीच्या कारला बसची धडक
काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील पर्यटकाची हत्या
काल घडलेल्या घटनेच्या काही दिवस आधी, मध्यरात्री नंतर ऑर्डर देण्याच्या कारणावरून बीच शॅक मालक आणि कामगार यांच्याबरोबरच्या वादानंतरच्या झालेल्या मारहाणीत कळंगुटमध्ये आंध्र प्रदेशातील २८ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी शॅक मालकासह पाच जणांना अटक केली आहे.
कायदा हातात घेऊ नये…
गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या या हिंसाचाराच्या घटनांबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी, उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी शॅक मालकांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर कौशल यांनी सांगितले की, “आम्ही आज शॅक मालकांसोबत बैठक घेतली असून, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. कोणी गैरवर्तन करत असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे. भविष्यात पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे अश्वासन शॅक मालकांनी दिले आहे.”