उत्तर काश्मीरमध्ये गुरेझ क्षेत्रात लष्कराने प्रत्यक्ष ताबा रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून त्यात चार दहशतवादी ठार झाले आहेत. बांदीपोरा जिल्ह्य़ात ही घटना घडली.

संरक्षण खात्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एन. एन. जोशी यांनी सांगितले की, मध्यरात्रीनंतरच्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. प्रत्यक्ष ताबारेषेवर तैनात केलेल्या जवानांनी काही अतिरेकी घुसखोरी करीत असताना त्यांना हटकले. त्यावेळी सुरक्षा दले व अतिरेकी यांच्यात चकमक झाली त्यात चार अतिरेकी मारले गेले. प्रवक्तयाने सांगितले की, चार एके ४७ रायफली यावेळी घटनास्थळावरून जप्त करण्यात आल्या आहेत. अजूनही चकमक सुरू असून मृत अतिरेक्यांची ओळख पटलेली नाही.
शस्त्रसंधीचे उल्लंघन
दरम्यान पाकिस्तानी तुकडय़ांनी केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान व एक गावकरी असे दोनजण पूँछ जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबा रेषेवर जखमी झाले. पाकिस्तानी लष्कराने १२ तासात तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून उखळी बॉम्ब व स्वयंचलित शस्त्रांचा वापर बालाकोट येथे केला. १२० एमएम व ८२ एमएमचे तोफगोळे टाकण्यात आले. त्यात एक जवान जखमी झाला त्याला रुग्णालयात दाखल केले आहे, त्याचबरोबर महंमद अशरफ हा नागरिकही जखमी झाला. तसेच काही गुरे ठार झाली. रविवारी सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी सोहन हे मंजाकोटर येथे पाकिस्तानी जवानांनी राजौरी जिल्ह्य़ात केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झाले होते.
पाककडून उपउच्चायुक्तांना समन्स
दरम्यान या आठवडय़ात दुसऱ्यांदा पाकिस्तानने भारताच्या उप उच्चायुक्तांना समन्स पाठवून बोलावले व भारताने सीमेवर केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी नागरिक ठार झाल्याचा निषेध केला. उपायुक्त जे. पी. सिंग यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात बोलावून भारत निरपराध नागरिकांना लक्ष्य करीत असल्याबाबत निषेध केला. पाकिस्तानचे तीन नागरिक निकियाल क्षेत्रातील बेछूट गोळीबारात मारले गेले आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला. बुधवारी पाकिस्तानचा एक सैनिक भारताच्या गोळीबारात मारला गेल्याच्या प्रकरणातही उपायुक्त सिंग यांना बोलावून पाकिस्तानने निषेध केला होता. भारताने प्रत्यक्ष ताबा रेषेवरील शस्त्रसंधीचे पालन करावे असे पाकिस्तानने म्हटले आहे.

Story img Loader