Pahalgam Terrorist’s Home Demolished: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत सरकारने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काल दोन दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त केल्यानंतर आता आणखी तीन दहशतवाद्यांची घरे स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आली आहेत. एकूण पाच अतिरेक्यांची घरे पाडून लष्कराने अतिरेक्यांचे कंबरडे मोडले आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील झाकीर अहमद गनी आणि शोपियाँ जिल्ह्यातील छोटीपोरा येथील लष्कर-ए-तैयबाचा कमांडर शाहिद अहमद कुट्टय यांची घरे स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आली आहेत.

शाहिद अहमद कुट्टय हा तीन ते चार वर्षांपासून अनेक राष्ट्रविरोधी कारवायात सामील होता.

याआधी लष्कराने अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील आदिल हुसैन ठोकेर (उर्फ आदिल गुरी), अवंतीपुरा येथील आसिफ शेख आणि पुलवामामधील एहसान शेख यांच्या घराचे पाडकाम केले होते.

गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठोकेरने २०१८ साली अटारी-वाघा सीमेतून पाकिस्तानमध्ये कायदेशीर प्रवेश मिळविला होता. मागच्या वर्षी तो लपून-छपून जम्मू-काश्मीरमध्ये परतला. पाकिस्तानमध्ये त्याने दहशतवादाचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले जात आहे. पहलगाम हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याचा त्याच्यावर संशय आहे.

दहशतवाद्यांची घरे पाडत असताना लष्कराच्या वतीने नियंत्रित स्फोटकाचा वापर केला गेला. जेणेकरून आजूबाजूच्या घरांना नुकसान पोहोचू नये, याची काळजी घेतली गेली. इतर सामान्य लोकांना कारवाईची झळ बसणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हे २०१९ साली हटविल्यानंतर पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी मोठा हल्ला करण्यात आला. बैसरन पर्वताच्या खोऱ्यात असलेल्या पठारावर काही दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत २६ निष्पाप नागरिकांचे बळी घेतले. मंगळवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला होता.