श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहाटे जुमागुंड भागात शोधमोहीम राबवली. त्यात पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. हे सर्व दहशतवादी परदेशी होते, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी ट्वीटद्वारे सांगितले. या वर्षांत काश्मीरमध्ये इतक्या मोठय़ा संख्येने दहशतवादी मारले जाण्याची ही पहिलीच घटना आहे. स्थानिक तरुणांनी दहशतवादाकडे पाठ फिरवल्यामुळे सध्या खोऱ्यातील सक्रिय दहशतवाद्यांची संख्या कमी झाल्याचे पोलीस आणि सैन्याचे म्हणणे आहे. यापूर्वी १३ जूनला कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते.