श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात मच्छिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या पाच दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी ठार केले. या दहशतवाद्यांकडून एके मालिकेतील पाच रायफलींसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार,२५ आणि २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कुपवाडा पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या या पाच दहशतवाद्यांना जवानांनी हटकले. त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर देण्यात आले. चकमकीत पाचही दहशतवादी ठार झाले.
हेही वाचा >>> भारताच्या ८ माजी नौसैनिकांना कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा; परराष्ट्र खात्याला निकालानं धक्का
बीएसएफ चौकीवर पाकिस्तानचा गोळीबार; भारताचे चोख प्रत्युत्तर
जम्मू / नवी दिल्ली : जम्मूमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्यांवर अचानक गोळीबार सुरू केला. त्यास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जशास तसे प्रत्युत्तर दिल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पाकिस्तानी रेंजर्सनी अर्निया सेक्टरमधील बीएसएफच्या चौकीवर रात्री आठच्या सुमारास कोणतेही सबळ कारण नसताना गोळीबार सुरू केला. हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. १७ ऑक्टोबरला पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान जखमी झाल्यानंतर आठवडाभरात दुसऱ्यांदा ही घटना घडली आहे.