रेल्वे तिकीटाचे आरक्षण करण्यापासूनच प्रवाशांना रेल्वेप्रवासाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. यापार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात नमूद करण्यात आल्याप्रमाणे ‘ई-तिकीटींग’ प्रणालीत नाविण्य आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून तिकीटींचे आरक्षण करण्याच्या सुविधेमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केलेली आहे.
रेल्वे अर्थसंकल्पातील घोषणांवर व्यवस्थितरित्या अंमलबजावणी करण्यात आली, तर पुढील पाच कारणांमुळे रेल्वे प्रवास सोपा होऊ शकतो..

* रेल्वेचे संकेतस्थळ कधीही क्रॅश होणार नाही-
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी केलेल्या घोषणेनुसार नव्या प्रणालीनुसार एका मिनिटाला तब्बल ७,२०० तिकीटांचे ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे. त्यामुळे यापुढे ‘आयआरसीटीसी’चे संकेतस्थळ कधीही क्रॅश होणार नाही अशी आशा व्यक्त करू शकतो.

* प्लॅटफॉर्म तिकीटही ऑनलाईन पद्धतीने काढता येणार-
प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठीची लांबचलांब रांग पाहता रेल्वे प्लॅटफॉर्मवर आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी जाता न येणाऱयांसाठीही खुशखबर आहे. प्लॅटफॉर्म आणि विनाआरक्षित तिकीटेही ऑनलाईन पद्धतीने काढण्याची सुविधा रेल्वेमंत्र्यांना सुरू करायची आहे. तसेच ‘पार्किंग-कम-प्लॅटफॉर्म’ असे कॉम्बो तिकीटही प्रवाशांना सोयीचे ठरू शकते असेही गौडा यांनी सुचविले आहे. त्यामुळे प्लॅमफॉर्म तिकीटांसाठी प्रवाशांना रखडावे लागणार नाही.

* प्रवाशांचे इच्छित स्थानक येताच वाजणार मोबाईल अलार्म-
रेल्वे प्रवासात मोबाईल फोनही महत्त्वाचा भाग बनणार आहे. मोबाईलवर आधारित ‘वेक-अप कॉल’ सुविधा म्हणजेच, इच्छित स्थानक येण्याआधी प्रवास करणाऱया व्यक्तीच्या मोबाईलवर अर्लाम सुरू होण्याची प्रणाली रेल्वेमंत्रालयाला सुरू करायची आहे.

* ‘प्री कुक्ड रेडी टू इट’ आणि खाद्यपदार्थांमध्ये स्वच्छता-
निवडक रेल्वे गाड्यांमध्ये ‘प्री कुक्ड रेडी टू इट’ पदार्थ उपलब्ध करून देण्यात येतील. रेल्वेमध्ये पुरविण्यात येणाऱया पदार्थांमध्ये स्वच्छता न बाळगल्यास संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली असल्याचे सदानंद गौडा यांनी सांगितले आहे. तसेच रेल्वेत नामांकीत कंपन्यांचे खाद्यपदार्थ पुरविणाऱयावर भर राहणार असल्याचेही गौडा यांनी सांगितले आहे आणि प्रवाशांना देण्यात येणाऱया पदार्थांच्या गुणवत्तेचे थर्ड पार्टी ऑडीटही केले जाणार आहे.

* जेवणाची सुविधाही ‘फास्ट’-
रेल्वेत दिल्याजाणाऱया पदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेसोबतच प्रवाशांना प्रवासात खाद्यपदार्थ सोप्या पद्धतीने आणि जलद गतीने मिळावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचेही गौडा म्हणाले आहेत. त्यादृष्टीकोनातून आता प्रवाशांना जेवणाची ऑर्डर रेल्वेत द्यावी लागणार नाही. देशातील महत्वाच्या स्थानकांवर जेवण आणि खाद्यपदार्थांच्या ऑर्डर थेट मोबाईल ‘एसएमएस’ने देण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यामुळेही प्रवासात वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
नवी दिल्ली-अमृतसर आणि नवी दिल्ली-जम्मूतवी मार्गांवर ही सुविधा प्राथमिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे.

Story img Loader