सुकमा : छत्तीसगडच्या सर्वाधिक नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात शनिवारी पाच महिलांसह २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. माओवादी विचारसरणीतील फोलपणा जाणवल्यामुळे निराश झाल्याने त्यांनी येथील पोलीस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केल्याचे सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी एक उईका लखमा नक्षलवाद्यांचा ‘डेप्युटी कमांडर’ आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अन्य सर्व नक्षलवादी दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना (डीएकेएमएल), क्रांतिकारी महिला आदिवासी संघटना (केएएमएस), चेतना नाटय मंडळीचे (सीएनएम) सदस्य म्हणून सक्रिय होते, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रचारफलक लावणे, या निर्बंधित संघटनांच्या विचारधारेचा प्रचार करणे, टेहळणी करणे, माग काढणे आदी नक्षलवादी हिंसक कारवाया करण्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. 

हेही वाचा >>> ‘आयसिस’चे १५ जण अटकेत; ‘एनआयए’ची पडघा, पुण्यासह कर्नाटकात कारवाई, विध्वंसाचा कट उधळला

नक्षलवाद्यांकडून ग्रामस्थाची हत्या

नारायणपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी एका ग्रामस्थाची हत्या केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोमल मांझी असे गावकऱ्याचे नाव आहे. त्यांनी सांगितले की, मांझी छोटेडोंगर गावातील देवी मंदिरात पूजा करून परतत असताना अज्ञात नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.  कोमल मांझी हा छोटेडोंगर येथील लोकप्रिय वैद्याचा (पारंपरिक वैद्यकीय व्यावसायिक) पुतण्या होता. दोघांनाही (काका-पुतण्या) यापूर्वी नक्षलवाद्यांकडून मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील भागातील काही जणांना नारायणपूर मुख्यालयात हलवले होते व सुरक्षा देण्यात आली होती. त्यात मांझी आणि त्यांचे काकाही होते. मतदानाचा दुसरा टप्पा संपल्यानंतर दोघे त्यांच्या गावी परतले आणि त्यांनी सुरक्षा नाकारली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five women among 20 naxalites surrender in chhattisgarh zws