भारताने आपल्या लोकसंख्येच्या धोरणात बदल केला नाही आणि सर्व धर्मांसाठी दोनपेक्षा जास्त अपत्ये जन्माला घालण्यावर बंधन घातले नाही, तर पाकिस्तानप्रमाणे आपल्यालाही मुलींना पडद्यामागे लपवून ठेवावे लागेल, असे मत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले. बिहारमधील पश्चिम चंपारणमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडले. या कार्यक्रमाला अनेक साधू आणि राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गिरीराज सिंह म्हणाले, हिंदूंना दोन मुलं आणि मुस्लिमांनाही दोनच मुलं असली पाहिजेत. आपली लोकसंख्या कमी होते आहे. बिहारचा विचार केला तर इथे सात जिल्हे असे आहेत, जिथे लोकसंख्या कमी होते आहे. तरीही लोकसंख्या नियंत्रणाच्या नियमांना बदलण्याची वेळ आली आहे. जर आताच या नियमांमध्ये सुधारणा केली, तरच आपल्याकडे मुली सुरक्षित राहतील. नाहीतर आपल्याकडेही पाकिस्तानप्रमाणे मुलींना पडद्यामागे लपवून ठेवावे लागेल.
किशनगंज आणि अरारियामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्याचा संदर्भ घेऊन बोलताना त्यांनी हे मत मांडले. भाजपचे स्थानिक खासदार सतीश दुबे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते नागेंद्रजी हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

Story img Loader