दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना दिल्लीतील द्वारका भागात फ्लॅट दिला जाईल व भावाला नोकरी दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्याची माहिती सामूहिक बलात्कार व हिंसाचार प्रकरणात बळी पडलेल्या मुलीच्या भावाने रविवारी येथे दिली.
त्याने सांगितले, की तिच्या आईच्या विनंतीवरून सोनियांनी या कुटुंबीयांना दिल्लीत फ्लॅट देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे व आपल्याला नोकरी देण्याचेही आश्वासन दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या मुलीच्या कुटुंबीयांसमवेत त्या तासभर होत्या. मुलीची आई यावेळी भावुक झाली व अनेकदा तिला रडू कोसळले. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेबाबत व अल्पवयीन गुन्हेगारांच्या वयाच्या अटीत बदल करण्याबाबत या वेळी चर्चा झाली. सोनिया गांधी यांनी लक्षपूर्वक त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला जे करता येणे शक्य आहे ते करू अशी ग्वाही त्यांनी दिली. ह्लतुम्ही कशाचीही काळजी करू नका, मी तुम्हाला माझे कुटुंब मानते अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला. या प्रकरणात आपण व्यक्तिगत लक्ष घातले असून, प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत आहोत,ह्व असेही त्या म्हणाल्या.
मुलीच्या भावाने सांगितले, की या मुलीला वाचवण्यात अपयशी ठरल्याबाबत सोनियांनी दु:ख व्यक्त केले. सोनिया गांधी यांनी चौथ्यांदा या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. दोनदा त्या रुग्णालयात आल्या होत्या. मुलीचा मृतदेह सिंगापूर येथून आणण्यात आला तेव्हाही त्या विमानतळावर आल्या होत्या. सोनिया गांधी यांनी या कुटुंबाच्या १९८३मध्ये बलियातून दिल्लीत झालेल्या स्थलांतराविषयी जाणून घेतले. त्या मुलीच्या खोलीत जाऊन त्यांनी तिची पुस्तके चाळली. तिच्या बालपणापासून ते फिजिओथेरपीला तिने प्रवेश घेतला तिथपर्यंतच्या काळातील अनेक आठवणी त्यांनी लक्ष देऊन ऐकल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flat in delhi to victime girl family and job to brother