आसाममध्ये आलेल्या महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून मंगळवारी जलप्रलयामुळे  ५७ गावांमधील परिस्थिती खूपच गंभीर बनली. राज्यातील धेमजी, चिरांग आणि लखिमपूर या जिल्ह्य़ांमधील गावे अधिक बाधित झाल्याची माहिती आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिली.
राज्यातील ११ जिल्ह्य़ांमधील सुमारे ४०० गावांना महापुराचा फटका बसला असून जवळपास १.५ लाख लोकांवर बेघर होण्याची पाळी आली आहे.
महापुराच्या लाटेत आतापर्यंत मोरीगाव जिल्ह्य़ातील एका नागरिकाचा बळी गेल्याचे समजते. या महापुराचा फटका काझिरंगा राष्ट्रीय उद्यान आणि पोबितोरा वन्यजीव अभयारण्यालाही बसला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी चर्चा करून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धेमजी आणि चिरांग जिल्ह्य़ांत आठ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून त्यामध्ये २ हजार ५०० नागरिकांनी आसरा घेतला आहे.
अरुणाचल प्रदेशातील पर्वतरांगांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जियाधोल नदीला महापूर आला असून त्याचा फटका धेमजी जिल्ह्य़ाला बसला आहे. या महापुरामुळे राज्यातील सहाशे हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. या महापुराचा धेमजी, तीनसुकीया, चिरांग, नागाव, गोलाघाट, जोरहाट, कामरूप, करिमगंज, लखिमपूर, मोरीगाव आणि शिवसागर या जिल्हय़ांना मोठा फटका बसला आहे.