कोलकाता : पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील जिल्ह्यांतील पूरस्थितीने गंभीर रुप धारण केले आहे. परंतु या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतेही साह्य मिळत नसल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केला. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पूरग्रस्त भागाला भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पश्चिम बंगाल सरकार युद्धपातळीवर या महापुराचा सामना करत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘उत्तर बंगालला पुराने वेढले आहे. कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलिपूरदौर यासारखे जिल्हे पुराने बाधित झाले आहेत. कोशी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे बिहारमधील जिल्हे आणि बंगालमधील मालदा, दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यांना फटका बसण्याची शक्यता आहे,’ असे ममता यांनी या वेळी सांगितले. राज्य सरकार आपल्या पद्धतीने पूरस्थिती युद्धपातळीवर हाताळत आहे. नद्यांच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. दार्जिलिंगमध्येही मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. लष्कराच्या मदतीने येथे मदतकार्य राबवले जात असल्याची माहिती ममता यांनी दिली.

हेही वाचा >>> शेवटची हिरवाई शिल्लक राहू द्या! नवी मुंबईतील क्रीडा संकुलाची जागा बिल्डरना देण्यावर सर्वोच्च न्यायालय नाराज

बिहारमध्ये पुराचा इशारा

पाटणा : बीरपूर आणि वाल्मिकीनगर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने बिहारच्या उत्तर, दक्षिण आणि मध्य भागात पुराचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाने सीतामढी जिल्ह्यातील मधकौल गावातील बागमती नदीचा बंधारा रविवारी तुटला. या घटनेनंतर गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

नेपाळमध्ये पूर, भूस्खलनाचे १७० बळी

काठमांडू : मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये आलेला पूर आणि भूस्खलनातील बळींचा आकडा १७० वर पोहोचल्याची माहिती रविवारी स्थानिक पोलिसांनी दिली. शुक्रवारपासून पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग जलमय झाला असून, देशाच्या काही भागांमध्ये अचानक पूर आल्याची माहिती आहे. पोलीस दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर, भूस्खलनात ६४ जण बेपत्ता असून, १११ जण जखमी झाले आहेत. तर काठमांडू खोऱ्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood situation alarming in north bengal centre not extending help says cm mamata banerjee zws