पीटीआय, बंगळूरु
सक्रिय र्नैऋत्य मॉन्सूनमुळे कर्नाटकात मुसळधार पाऊस पडत असून अनेक लहान ओढे दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने नऊ जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच राज्यात पूरस्थिती उद्भवण्याची भीती आहे.
बेळगाव, धारवाड, उत्तर कन्नड, हावेरी, हासन, शिवमोगा, उडुपी, दक्षिण कन्नड आणि कोडागु या जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद राहतील. तर हवामान खात्याने उडुपी, दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ‘रेड अॅलर्ट’ जारी केला आहे. काही भागांमध्ये वीजपुरवठा तात्पुरता खंडित होईल, वाहतुकीमध्ये काहीसा गोंधळ उडेल आणि कच्च्या व असुरक्षित बांधकामांचे नुकसान होऊ शकते, असे हवामान विभागाने सांगितले.
त्याबरोबरच चिक्कमगलुरू, कोडागु, शिवमोगा येथे ‘ऑरेंज अॅलर्ट’, तर बेळगाव, हावेरी, कळबुर्गी, विजयापुरा आणि हासन येथे ‘यलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्याच्या निरनिराळय़ा भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांची पाण्याची पातळी वाढून सखल भाग पाण्याखाली गेला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेत्रावती, फाल्गुनी या नद्या आणि अनेक ओढय़ांची पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीकिनाऱ्यावरील लोकांना धोका निर्माण झाला आहे. बंटवाल तालुक्यातील काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशला ‘ऑरेंज अॅलर्ट’
हिमाचल प्रदेशच्या सात जिल्ह्यांमध्ये २६ जुलै ते २८ जुलै या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला असून ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला आहे. या पावसाळय़ात पावसाचे जुने विक्रम तोडले जातील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.राज्य हवामान विभागाचे प्रमुख सुरेंदर पॉल यांनी सांगितले की, ‘राज्यात किमान एक आठवडा पाऊस सुरू राहील. विशेषत: २६ ते २८ जुलैदरम्यान मुसळधार पाऊस पडेल’. सिमला, सिरमौर, सोलन, मंडी, कुल्लू, कांगडा आणि चंबा या सात जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.