परदेशात दडविलेला काळा पैसा परत आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांना फारसे यश मिळणार नाही, कारण अमेरिका, इंग्लंड यांसारखे पाश्चिमात्य देशच या बेकायदेशीर निधीचे लाभार्थी आहेत, असे अमेरिकास्थित ग्लोबल फायनान्शियल इण्टेग्रिटी (जीएफआय)ने म्हटले आहे.
ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन भारताने आता देशातील पैसा परदेशात जाणार नाही याची अधिक काळजी घ्यावी, कारण हे प्रमाण नऊ पटीने वाढले आहे, असे जीएफआयचे अध्यक्ष रेमण्ड बेकर यांनी म्हटले आहे. सहज सोडविता येण्यासारखे हे प्रश्न नाहीत. त्यामुळे देशातील पैसा परदेशात जाण्याचा वाढता प्रवाह अडविणे हेच मुख्य आणि महत्त्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून काम करणे हे काळा पैसा परत आणण्यापेक्षा अधिक यशस्वी ठरेल, असेही जीएफआयने म्हटले आहे. देशातील पैसा परदेशात पाठविण्याच्या क्षेत्रात भारताने मलेशियाला मागे टाकले आहे. चीन, रशिया आणि मेक्सिकोनंतर भारताचा क्रमांक लागतो.
कोणत्याही देशातून काळा पैसा परत आणणे कठीण असते, कारण आंतरराष्ट्रीय यंत्रणा हाच मुख्य अडसर असतो, कारण अमेरिका, इंग्लंडसारखे देश त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पैशांचा प्रवाह अडविण्यास उत्सुक नसणार, असेही जीएफआयने म्हटले आहे.