चारा घोटाळाप्रकरणी पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर सुमारे अडीच महिने तुरुंगात काढल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची सोमवारी बिरसा मध्यवर्ती तुरुंगातून जामिनावर सुटका झाली.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आघाडी उघडण्याचे संकेत देत लालू यांनी आपली पुढील व्यूहरचना स्पष्ट केली. देशभरातील जातीयवादी शक्ती दिल्लीच्या तख्तावर ताबा मिळवू इच्छित आहेत परंतु त्यांना त्यांच्या मार्गावरून हटविण्यास मी आता मुक्त झालो आहे, अशी राणाभीमदेवी गर्जना लालूप्रसाद यांनी तुरुंगाबाहेर पडल्यावर केली.
केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या येथील न्यायालयात जामिनासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर ६६ वर्षीय लालूप्रसाद यादव यांना शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांना सोमवारी जामिनावर सोडण्यात आले. जातीयवाद्यांविरोधात आपण लढा देणार असून दिल्लीवर ताबा मिळविण्याचे या शक्तींचे प्रयत्न आहेत. मात्र त्यांचे हे प्रयत्न आपण हाणून पाडू, या शब्दांत लालूप्रसाद यादव यांनी भाजप व मोदी यांना आव्हान दिले.
देशभरात दौरा करून आपण धर्मनिरपेक्ष शक्ती बळकट करण्यासाठी आता प्रयत्न करणार असून नरेंद्र मोदी, भाजप अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वप्न कधीही पुरे होऊ देणार नाही, असे यादव यांनी तुरुंगाबाहेर जमलेल्या पत्रकारांना सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाबद्दल विचारले असता, नरेंद्र मोदी असोत किंवा अन्य कोणी मोदी, मी आता बाहेर आलो असून लढय़ास तयार आहे, असे लालूप्रसाद यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा