केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी करोनासंदर्भातील नियमांचा उल्लेख करत एक पत्र लिहिलं आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी हे पत्र लिहिलं असून चीनमधील करोनाचा उद्रेक लक्षात घेता हे पत्र लिहिण्यात आल्याचं सांगितलं आहे.
चीन आणि पूर्व आशियामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातील आरोग्य खातं संभाळणाऱ्या मांडविया यांनी राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान करोनासंदर्भातील नियमांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे असं म्हटलं आहे. यात मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आत्यावश्यक असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी म्हटलंय.
“केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होता येईल. नियमांचा पालन करा नाहीतर यात्रा रद्द करा,” असा थेट उल्लेख या पत्रात आहे. देशाचं हित लक्षात घेता काँग्रेसने करोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं अथवा ही यात्राच रद्द करावी असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील आपत्कालीन स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेणं गरजेचं आहे, असंही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे. म्हणूनच हे पत्र राजस्थानमध्ये सत्तेत असलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री गेहलोत यांनाही पाठवण्यात आलं आहे.