उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये २ जुलै रोजी एका सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन १२१ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उत्तर प्रदेशसह देशभरात खळबळ माजली. भोले बाबा नामक बाबाच्या भक्तांमध्ये दलितांचा अधिक भरणा असल्याची चर्चा समोर आली होती. त्यानंतर आता बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी अशा बाबा-बुवांच्या मागे जाण्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती म्हणाल्या, “गरीब, दलित आणि वंचितांनी आपल्या समस्या घेऊन भोले बाबा सारख्या बुवा-बाबांच्या नादी लागण्याची काहीही गरज नाही. अशा भंपक बाबांद्वारे समाजाची दिशाभूल करण्यात येते. समाजाला अंधश्रद्धेच्या मार्गावर नेण्याचे काम हे बाबा-बुवा करत असतात.” मायावती यांनी एक्सवर पोस्ट करून आपले विचार मांडले आहेत.

“गरीब, दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गक्रमण करत स्वतःच्या हातात सत्ता घ्यावी आणि त्याद्वारे स्वतःचे नशीब बदलण्याचा प्रयत्न करावा. अर्थात त्यासाठी तुम्हा सर्वांना बसपात सामील व्हावे लागेल. तेव्हाच वंचितांचा, गरीबांचा हाथरस सारख्या दुर्घटनांपासून रक्षण होऊ शकते. हाथरसमध्ये चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा प्राण जाण्याची घडलेली घटना दुर्दैवी आहे”, अशी भावना व्यक्त करत मायावती यांनी भोले बाबावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

मायावती पुढे म्हणाल्या, “हाथरस प्रकरणात भोले बाबा आणि इतर संबंधित दोषींविरोधात कडक कारवाई व्हायला हवी. तसेच भोले बाबा सारख्या इतर बाबांवरही कारवाई व्हावी. अशा प्रकरणात सरकारने राजकीय स्वार्थ न पाहता कारवाईत कोणतीही कसूर करू नये. जेणेकरून भविष्यात अशा प्रसंगात लोकांना आपला जीव गमवावा लागणार नाही.”

चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा सेवादारांना अटक केली आहे. या सेवादारांनी हाथरसच्या फुलराई गावात २ जुलै रोजी सुरजपाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाच्या सत्संगाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये सत्संग संपल्यानंतर चेंगराचेंगरी होऊन १२१ लोकांना आपला प्राण गमवावे लागले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow dr babasaheb ambedkar not babas bsp chief mayawati appeal to poor dalit after hathras stampede kvg
Show comments