मंगळुरु येथील शक्तीनगर भागातील सिटी नर्सिंग अॅण्ड पॅरामेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना काल(सोमवार) वसतीगृहाच्या कँटीनमधील रात्रीचे जेवण घेतल्यानंतर पोटदुखी, उलटी, अस्वस्थपणा असा त्रास जाणवू लागला होता. यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिकदृष्ट्या हा अन्न विषबाधेचा प्रकार दिसत असल्याचे समोर आले आहे.
मंगळरुच्या पोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी रुग्णालयांना भेट दिली. एकूण १३७ विद्यार्थ्यांवर सहा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलीस आयुक्तांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की,“आम्हाला माहिती मिळाली पहाटे २ वाजेपासून सुमारे १३७ विद्यार्थांना अन्नातून विषबाधा झाल्याने पोटदुखी, उलटी, मळमळणे आदी त्रास जाणवू लागला आणि त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जवळपास १३७ विद्यार्थ्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आम्ही या घटनेमागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.”
याचबरोबर, “अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळजी करण्याची किंवा घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही वसतीगृहास भेट देऊ, वॉर्डनशी संवाद साधू आणि सर्व माहिती घेऊ. सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर आहेत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.” असे जिल्हा आरोग्य निरीक्षक डॉ. अशोक यांनी सांगितले आहे.
याप्रकरणी आतापर्यंत हे समजलेले नाही की विद्यार्थ्यांच्या जेवणात असं काय आलं होत, की ज्यामुळे त्यांना अन्न विषबाधा झाली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करण्यासाठी विद्यार्थ्यांना रात्री देण्यात आलेल्या जेवणाचे नमूने घेतले आहेत. पुढील तपास सुरू आहे.