भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
अन्न सुरक्षा विधेयक अध्यादेशाव्दारे संमत करून घेण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचे भारतीय जनता पक्षाचे(भाजप) अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तसेच अन्न सुरक्षा विधेयकास भाजपचा विरोध नसून या विधेयकात काही दुरुस्त्या करण्याची आमची मागणी असल्याचे सिंह यांनी सांगितले. राजनाथ सिंह नागपूर येथील संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी या विधेयकाला भाजपचा विरोध नसला असे स्पष्ट केले असले तरी, विधेयकात कोणत्या दुरूस्त्या हव्या आहेत याची माहिती दिलेली नाही.
विधेयकाला झालेल्या दिरंगाई बाबत बोलत असताना राजनाथ सिंह म्हणाले, “२००४ मध्ये सत्तेत आल्यानंतर १०० दिवसांच्या आत हे विधेयक संमत करण्यात येईल असे आश्वासन यूपीए सरकारने दिले होते. मात्र, सरकारला हे विधेयक संमत करण्यात इतका वेळ का लागला?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.