मागच्या महिन्यात उत्तर प्रदेश गोरखपूरहून दिल्लीला आलेल्या ट्रेनमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला होता. दरोडयाच्या प्रयत्नातून हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी सुरुवातीला बांधला होता. सबजी मंडी येथील शवविच्छेदन केंद्रात पोलिसांनी या महिलेचा मृतदेह पाठवला. शवविच्छेदनात गळा आवळून या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले. मेहर जान असे मृत महिलेचे नाव होते.

या महिलेसंदर्भातील सर्व माहिती शोधून काढण्यासाठी पोलिसांनी एक पथक बनवले. तपासामध्ये या महिलेच्या पतीने उत्तमनगर पोलीस स्थानकात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली असल्याची माहिती मिळाली. या महिलेचा मृतदेह तिच्या पतीकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काही दिवसांनी महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या नवऱ्यावर अब्दुल हाशिम अन्सारीवर संशय व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली. अब्दुल अन्सारीच्या चौकशीत त्याच्या विधानांमध्ये विरोधाभास आढळून आला. त्यामुळे रेल्वे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. चौकशीचे ससेमिरा मागे लागल्यानंतर अखेर अन्सारीने पत्नी मेहर जानची हत्या केल्याची कबुली दिली.

मेहरच्या प्रकृती संदर्भातील तक्रारी वाढत चालल्या होत्या. अलीकडे ती वारंवार आजारी पडायची त्यामुळे मी हताश झालो होतो असे अन्सारीने सांगितले. मी पत्नीची एलआयसी पॉलिसी काढली होती. पुन्हा लग्न करण्यासाठी मला पैशांची गरज होती त्यासाठी आपण पत्नीची हत्या केल्याची त्याने कबुली दिली.

घटनेच्या दिवशी अन्सारी आणि मेहर दोघे आनंद विहार आयएसबीटी येथे गेले होते. गुडघ्याच्या उपचारासाठी आपण डॉक्टरकडे जाऊया असे अन्सारीने मेहरला सांगितले. दोघांनी तिथून सिमभावली येथे जाण्यासाठी बस पकडली. तिथे पोहोचल्यानंतर अन्सारीने डॉक्टर नाहीय असे मेहरला सांगितले. दोघांनी पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी ट्रेन पकडली. त्यानंतर ट्रेनमध्येच अन्सारीने पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या केली. पत्नीची स्लीपर आणि ओढणी ट्रेन बाहेर फेकल्यानंतर तो विवेक विहार येथे ट्रेनमधून उतरला. ट्रेन जुनी दिल्ली येथे पोहोचल्यानंतर महिलेचा मृतदेह सापडला.

Story img Loader