भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आता सभांमध्ये गर्दीची सवय झाली आहे. शनिवारी कानपूर येधे पार पडलेल्या भाजपच्या सभेसाठी लोकांची व कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाली होती. मात्र, २५ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील झाशी या ठिकाणी होत असलेल्या भाजपच्या सभेसाठी गर्दीची वानवा होण्याची जाणीव भाजपच्या येथील सभेच्या आयोजकांना झाली आहे. भाजपच्या या आयोजकांनी तत्परतेने यावरही तोडगा काढला आहे. शेजारील मध्य प्रदेशमधील लोकांना मोठ्या संखेत गोळाकरून झाशीच्या सभेसाठी उतरवण्याचा अजब निर्णय सभेच्या आयोजकांनी घेतला आहे.
कानपूर सभेसाठी भाजपकडून चार लाखांवर लोक उपस्थिती लावणार असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षामध्ये सुमारे १.२५ लाखांचा जमाव या सभेमध्ये होता. आता झाशीच्या सभेसाठी भाजपकडून दोन लाख लोक एकत्र आणण्याचा संकल्प सोडण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजले.
“मध्य प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अनेक कार्यकर्ते मोदींचे भाषण ऐकण्यासाठी झाशी येथे जाणार आहेत. मोदींच्या झाशी येथील भाषणाचा मध्य प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला निश्चित फायदा होणार आहे,” असे मध्य प्रदेश भाजपचे प्रवक्ते विजेंद्रसिंग सिसोदीया म्हणाले.
“भाजपच्या तिकीटावर मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार तयार आहेत. या उमेदवारांपैकी जे २५ ऑक्टोबरला झाशी येथे होत असलेल्या सभेसाठी मध्य प्रदेशमधून लोकांना मोठ्या संखेत घेऊन जातील त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे,” असे भाजपच्या उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंड विभागाचे अध्यक्ष बाबूराम निशध यांनी सांगितले. मध्य प्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील व झाशीमधील प्रवासाचे अंतर केवळ २५ किमी आहे. झाशी जिल्ह्यामध्ये लोकसंखेची घनता कमी असल्याने सभेसाठी गर्दी कमी होण्याच्या भितीने भाजपच्या नेत्यांनी धसका घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For narendra modis jhansi rally bjp to ferry crowds from mp
Show comments