राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी सुनावलं. याप्रकरणी आता पुढची सुनावणी मंगळवार,१७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुनावणी संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीचं प्रकरण एकत्रित केलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला कोर्ट न्याय देईल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, सुप्रिया सुळे आज पहिल्यांदाच कोर्टात आल्या होत्या. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना शरद पवार मुंबईत होते. तर, सुप्रिया सुळे कोर्टात हजर राहून सुनावणीत सहभागी झाल्या. याबाबत पत्रकारांनी त्यांना आज विचारल्यावर त्या म्हणाल्या की, “मी आयुष्यात पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढली आहे. मी कोर्टबाजीसाठी राजकारणात नाही आले. मी राजकारणात सर्वसामान्य माय-बाप जनतेची सेवा आणि चांगले धोरण आखण्यासाठी आले होते. मला वाटलं नव्हतं हा दिवस येईल. शेवटी ही सत्याची लढाई आहे. सत्यासाठी जे काही करावं लागेल ते करेन. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचे असंख्य कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्रात पवारांनी अनेक वर्ष केलेलं काम आणि मायबाप जनतेचं प्रेम आणि आशीर्वादामुळे आम्ही उभे आहोत. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही उभे आहोत. हा वैयक्तिक वाद नाही की पवार कोणती निवडणूकही लढवणार नाहीयत. हा विषय नैतिकतेचा आहे, ही लढाई नैतिकतेची आहे. सत्य आणि असत्याची ही लढाई आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
न्यायालयात आज काय घडलं?
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या प्रकरणाची सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी प्रलंबित आहे. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यांपूर्वी विधानसभा अध्यक्षांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्यामुळे महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना सुनावत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून योग्य ती पावलं उचलण्यात न आल्यामुळे आज न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून सुनावलं आहे. आता पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.