राज्यसभेत जम्मू-काश्मीरच्या अर्थसंकल्पावर मंगळवारी चार तास झालेली चर्चा काश्मिरी पंडित आणि ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून झालेल्या वादंगामुळे अधिक गाजली. “द काश्मीर फाइल्स चित्रपटाला विरोध कशाला करता. या चित्रपटातील भाषेपेक्षा भाजपानेत्यांची विधाने जहाल असतात. त्यांच्या भाषणांच्या ध्वनिफितींचे वाटप केले तर चित्रपटापेक्षाही जास्त प्रभावी ठरेल”, अशी उपहासात्मक टीका समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी राज्यसभेत केली. यानंतर संसदेमध्ये मोठा वाद निर्माण होत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. याचदरम्यान केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरमधील विकासकामांचा दाखला देताना तीन महिने या ठिकाणी हॉटेल रुम उपलब्ध नसल्याचं सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेताना, “३७० रद्द करेपर्यंत लोकांचे हाल होत होते. त्यामुळे आता काहीजण (चित्रपटामुळे) अडचणीत येणे स्वाभाविक आहे. मात्र आजच्या काश्मीरमध्ये आखाती देशामधील प्रतिनिधी रिअल इस्टेट, टेलिकम्युनिकेशन आणि कृषी क्षेत्रामधील गुंतवणूक करण्यासाठी येत आहेत, हा मोठा बदल आहे,” असं म्हणाले. आखाती देशातील ६९ सदस्यांचे शिष्टमंडळ काश्मीर खोऱ्यात असून उर्जा, पर्यटन आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी या देशांकडून गंभीर विचार केला जात आहे. मग, खोऱ्यामध्ये विकास होत नसल्याचा आरोप विरोधक कशासाठी करत आहेत? अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या विकासातील ३७० अडथळे दूर करण्यात आले आहेत, असा दावा नक्वी यांनी केला.

या चर्चेदरम्यान केंद्रीय पर्यटन मंत्री जी कृष्णा रेड्डी यांनीही सहभाग घेत काश्मीरमध्ये सकारात्मक बदल झाल्याचं सांगितलं. अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून या ठिकाणी सकारात्मक बदल झाल्याचा दावा केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी केला. “पर्यटन क्षेत्रामध्येही आपण पुढे जात आहोत. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या महिन्यामध्ये, ३२२ विमानांनी जम्मूसाठी उड्डाण घेतलं. श्रीनगरमध्ये ५१२ विमानं पर्यटकांना घेऊन गेली. पुढील तीन महिन्यांसाठी श्रीनगरमधील सर्व हॉटेल्स फूल आहेत. तिथे एकही रुम उपलब्ध नाहीय. रात्री विमान सेवा या ठिकाणी उपलब्ध नव्हती. आम्ही ही सुविधाही सुरु केली. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरचं हे जम्मू आणि काश्मीरमधील सत्य आहे,” असं रेड्डी म्हणाले.

केंद्रातील ७० मंत्री खोऱ्यात जाऊन आले पण, काश्मिरी लोकांच्या समस्या तशाच राहिल्या असल्याचा आरोप काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी केला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हरकतीच्या मुद्दय़ाला विरोधकांनी आक्षेप घेतला पण, पीठासीन अधिकारी भुवनेश्वर कलिता यांनी विरोधकांचे म्हणणे मान्य केले नाही. त्यामुळे संतापलेल्या विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कलितांवर ‘प्रहार’ केला. कलिता काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेल्याचा रागही उफाळून आला. ‘‘तुमची निष्ठा कुठे आहे हे आम्हाला माहीत आहे’’, असे खरगे म्हणाले. त्यावरून सभागृहात गोंधळ माजला. केंद्रीयमंत्री मुख्तार नक्वी यांनी, ‘सभापतींच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीवर टीका करणे नियमबाह्यच नव्हे तर, मर्यादाभंग आहे. खरगेंनी माफी मागितली पाहिजे’, अशी मागणी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the next three months there is no room availability in srinagar says union minister for tourism g kishan reddy scsg