इराकसह सीरिया आणि आजूबाजूच्या देशांमधील दहशतवादी संघटनांकडून निर्माण झालेल्या धोक्याविरोधात जागतिक एकी निर्माण करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आरंभलेल्या प्रयत्नांना शुक्रवारी फ्रान्सच्या इराकमधील पहिल्या हल्ल्यांमुळे बळकटी मिळाली आहे.
इराकमधील हल्ल्यांना फ्रान्स कधीच पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका फ्रान्सच्या याआधीच्या अध्यक्षांनी घेतली होती. त्यानंतर दहा वर्षांनी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कोस होलांदे यांनी युद्धग्रस्त इराकमधील अमेरिकेच्या हवाई मोहिमेत आपला देश सहभागी होत असल्याचे सांगितल्याने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अधिक परिणामकारक ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
इराकमधील ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करूनच शुक्रवारी सकाळी आपल्या विमानांनी हवेत उड्डाण केले आणि त्यात आम्हाला यश मिळाल्याचे होलांदे यांनी शुक्रवारी निवेदनात म्हटले. लक्ष्यावर हल्ले झाले आणि त्यात ते पूर्णपणे बेचिराख झाले आहेत, असे होलांदे यांनी पुढे म्हटले आहे. टेहळणी मोहिमेकरिता इराकच्या आकाशात फ्रान्स आणि इंग्लंडने याआधी आपली विमाने धाडली होती. परंतु फ्रान्सने शुक्रवारी पहिल्यांदाच हवाई हल्ला चढवला.
गेल्या ८ ऑगस्टपासून अमेरिकेने इराकमध्ये १७० हल्ले चढवले आहेत. परंतु दहशतवादाविरोधातील मोहिमेत अमेरिकेला एकटय़ालाच लढायचे नसून त्याकरिता जागतिक आघाडी स्थापन करायची आहे. त्याला फ्रान्सच्या या हल्ल्याने बळकटी मिळाली आहे. ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत आहे. तो वेळीच रोखणे गरजेचे आहे. यासाठी पाश्चिमात्य देशांनी इराकमधील कुर्दीश सैन्यांना मदत म्हणून हवाई मोहिमेत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
जो प्रदेश स्थानिक सैन्यांच्या ताब्यातून निसटला आहे. तो परत मिळवण्याच्या प्रयत्नांत अमेरिका मदत करीत होती. आता त्याला फ्रान्स आणि ब्रिटनची मदत मिळणार मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forces ready for anti isis alliance