काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी काश्मिरी पंडितांना होणारा त्रास, त्यांची दुःखं मांडली आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी काश्मिरी पंडितांच्या एका प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली होती. या प्रतिनिधींनी राहुल यांच्यासमोर आपली वेदना मांडली. मोदी सरकारला लक्ष्य करत राहुल यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, “दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या काश्मिरी पंडितांना कोणत्याही सुरक्षेशिवाय खोऱ्यात जायला भाग पाडणं ही क्रूरता आहे. हे मोदी सरकारचं निर्दयी पाऊल आहे.”
राहुल यांनी मोदींना लिहिलेलं पत्र हिंदी भाषेत आहे. त्यांनी हे पत्र मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर शेअर केलं आहे. त्यात राहुल यांनी लिहिलं आहे की, “पंतप्रधान महोदय, भारत जोडो यात्रेदरम्यान काश्मिरी पंडितांचं एक प्रतिनिधी मंडळ मला भेटायला आलं होतं. तेव्हा त्यांनी त्यांची दुःखद परिस्थिती मला सांगितली. दहशतवाद्यांच्या रडारवर असलेल्या काश्मिरी पंडितांना कोणत्याही सुरक्षेशिवाय खोऱ्यात जाण्यास भाग पाडणं हे क्रूर पाऊल आहे. तुम्ही या प्रकरणी योग्य ती पावले उचलाल अशी आशा आहे.”
काश्मीर खोऱ्यात भीती आणि निराशेचं वातावरण
राहुल यांनी काश्मिरी पंडितांच्या अलिकडच्या टार्गेट किलिंगचा उल्लेख केला. राहुल म्हणाले की, “या हत्यांमुळे काश्मीर खोऱ्यात भीती आणि निराशेचं वातावरण आहे. काश्मीर खोऱ्यात कामगारांना कोणत्याही सुरक्षेशिवाय कामावर परतायला सांगितलं जात आहे, हा त्यांच्यासोबतचा निर्दयीपणा आहे.”
हे ही वाचा >> ‘चिटफंड’ प्रकरण : चिदंबरम यांच्या पत्नीसह तिघांची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त
शासकीय अधिकाऱ्यांचं क्रूर पाऊल
राहुल यांनी सांगितलं की, भारत जोडो यात्रेदरम्यान एका टप्प्यावर त्यांची काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधींशी भेट झाली. “त्यांनी सांगितलं की, शासकीय अधिकारी त्यांना काश्मीर खोऱ्यात जाण्यास जबरदस्ती करत आहेत. येथील चिंताजनक परिस्थितीत सुरक्षेची कोणतीही हमी नसताना पंडितांना काश्मीर कोऱ्यात जाण्यास भाग पाडणं हे एक क्रूर पाऊल आहे.”