नवी दिल्ली : बीबीसीचा वृत्तपट प्रदर्शित होण्याची वेळ ही अपघाती नाही, हे वेगळय़ा प्रकारे केले गेलेले राजकारण आहे, असा आरोप परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केला. राजकीय आखाडय़ात उघडपणे उतरण्याची हिंमत नसलेले लोक माध्यमांद्वारे राजकारण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. बीबीसीच्या गुजरात दंगलींवर आधारित वृत्तपटामुळे वाद निर्माण झाला होता. सरकारने या वृत्तपटांवर बंदी घातली आहे.
हा वृत्तपट २०२४च्या निवडणुकीच्या आधीच कसा आला, असा प्रश्न त्यांनी विचारला. कधी कधी भारतातील राजकारण केवळ सीमांच्या आतमध्ये घडत नाही ते बाहेरील देशातून आत येते, असा दावा त्यांनी केला. एखादी गोष्ट परदेशातून सांगण्यात आली म्हणजे ती खरीच आहे असे अनेकांना वाटते. भारताची, सरकारची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा कशी घडवली जाते हे त्यातून दिसते असे ते म्हणाले. अशा वृत्तपटांचे आनंदाने स्वागत करणारे कोण आहेत, दिल्लीमध्ये १९८४ मध्ये काय घडले ते आपण सर्वानी पाहिले आहे, त्याविषयी वृत्तपट का येत नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले.
चीन प्रश्नावरून राहुल गांधींवर टीका
चीनच्या सीमेवर सैन्य कोणी पाठवले, मोदींनी की राहुल गांधींनी, असा सवाल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी विचारला. लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीवरून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. त्याला जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले. सैन्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असतो, विरोधी पक्षातील नेत्यांना नाही, हे ज्ञात असतानाही जयशंकर यांनी असे वक्तव्य केले हे विशेष.