पाकच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांचे मत
दहशतवाद हा भूतकाळातील मंत्र होता, भविष्यकाळाचा तो मंत्र नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीकडे वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहावे, त्याबाबत भावनात्मक होऊ नये, असे  मत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची शनिवारी येथे बैठक होणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या पातळीवरील बैठक झाली. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेचा आढावा घेण्याबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या चर्चेचा तपशील सचिव पातळीवरील बैठकीत ठरविण्यात आला.
श्रीमती खार म्हणाल्या,”परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांच्याबरोबरील चर्चेत पारपत्राबाबत (व्हिसा) नव्याने करार करण्यात येईल. व्यापारासारख्या क्षेत्रांमध्ये भारताशी सहकार्य वाढविण्यासाठी पाकिस्तान नव्याने विचार करीत आहे. याबाबतचे स्पष्ट संकेत आम्ही दिले आहेत. आमच्या आधीच्या अनेक धोरणांमध्ये बदल करण्याची आमची तयारी आहे. यासाठी आधी लहान पावले उचलून परस्परांत विश्वास निर्माण करावा लागेल. त्यानंतर सहकार्याची झेप घेणे दोन्ही देशांना शक्य होईल. याकरीता दोन्ही देशांना मानसिक धारणांमध्येही बदल करावा लागेल. ही प्रक्रिया याअगोदरच सुरु झाली आहे. दोन्ही देशांमध्ये फक्त दहशतवाद हाच चर्चेचा विषय असल्याचे मला सांगण्यात आले तेव्हा मला वाईट वाटले. दहशतवाद हा पाकिस्तानलाही नवा नाही.
“मुंबई हल्ल्याबाबतच्या खटल्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीबद्दल त्यांनी सांगितले की, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून काही उपयोग नाही. याकडे भावनात्मकतेने नव्हे तर वास्तववादी दृष्टीने पाहिले पाहिजे.
सचिव पातळीवरील बैठक सकारात्मक आणि अत्यंत मोकळ्या वातावरणात झाल्याचे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी मान्य केले. परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी आम्ही एकूण स्थितीचा आढावा घेतला. आता त्याबाबतची माहिती संबंधित मंत्र्यांना दिली जाईल, असे पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांनी सांगितले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांच्यात शनिवारी चर्चा होणार असून, बैठकीचा तपशील ठरविण्यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव रंजन मथाई आणि जिलानी यांच्यात प्राथमिक चर्चा झाली.
मथाई आणि जिलानी यांच्यात मोकळेपणाने आणि सकारात्मक चर्चा झाली. नव्याने सुरू होणाऱ्या चर्चेबाबतच्या सर्व बाबींवर चर्चा झाली आणि आतापर्यंत झालेल्या चर्चेचा आढावाही घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले.
दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासंदर्भात प्रगती झाली असल्याचे उभयतांनी मान्य केले असून, अधिक पोषक वातावरण निर्माण होण्याची गरज असल्याचेही दोघांनी मान्य केले. संयुक्त आयोगाच्या कार्यकारी गटाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला असून दोन्ही सचिव संबंधित मंत्र्यांना त्याबाबत अवगत करतील, असेही अकबरुद्दीन म्हणाले.

Story img Loader