S Jaishankar Meets Pakistan PM Shahbaz Sharif: भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या ७ दशकांहून अधिक काळापासून तणावपूर्ण संबंध राहिले आहेत. मध्ये काही काळासाठी संबंध सुधारल्याचं वाटताच पुन्हा सीमेपलीकडून दहशतवादी हल्ले किंवा काही गंभीर विधानं होतात आणि संबंध पुन्हा बिघडतात. गेल्या काही वर्षांपासून हे संबंध असेच ताणले गेले असून सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया होत असताना पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा होऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका भारतानं घेतली आहे. पण असं असलं, तरी नुकतीच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची मोजून २० सेकंदांसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्याशी भेट झाली. आता त्यांच्यात तेवढ्या वेळात काय बोलणं झालं, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
गेल्या ९ वर्षांमध्ये भारताच्या कोणत्याही केंद्रीय मंत्र्यानं पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. याआधीचा असा दौरा थेट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी डिसेंबर २०१५मध्ये केला होता. त्यावेळी त्यांनी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये भारताकडून सहभाग घेतला होता. त्यानंतर थेट आत्ता परराष्ट्रमंत्री ए. जयशंकर यांचा हा दौरा आहे. जयशंकर हेदेखील एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले आहेत.
SCO कॉन्क्लेव्हसाठी जयशंकर पाकिस्तानमध्ये!
पाकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात SCO च्या कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे. या कॉन्क्लेव्हच्या निमित्ताने एस. जयशंकर मंगळवारी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दाखल झाले. यावेळ पाकिस्तानचे उच्चपदस्थ अधिकारी नूर खान यांनी जयशंकर यांचं स्वागत केलं.
शाहबाझ शरीफ यांची डिनर डिप्लोमसी!
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी SCO कॉन्क्लेव्हसाठी आलेल्या सर्व देशांच्या प्रतिनिधींसाठी डिनरचं आयोजन केलं होतं. यानिमित्ताने एस. जयशंकर यांनीही भारताचे प्रतिनिधी म्हणून या डिनरला हजेरी लावली. यावेळी खुद्द शाहबाझ शरीफ यांनी जयशंकर यांचं स्वागत केलं. तेव्हा जयशंकर व शरीफ यांच्यात अवघ्या २० सेकंदांची भेट झाली. पण या भेटीमध्ये दोघेही आपलं म्हणणं ठामपणे मांडत असून एकमेकांच्या मुद्द्यांना ते तितक्याच स्पष्टपणे प्रतिसादही देत असल्याचं दिसत आहे.
India vs Canada Row: ‘कॅनडाचे आरोप गंभीर, भारतानं…’, अमेरिकेनं भारताला काय सांगितलं?
पाकिस्ताननं सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांबाबत आधी चर्चा करावी, नंतर द्वीपक्षीय संबंध सुधारण्यासंदर्भात चर्चा होईल, अशी भूमिका भारताकडून घेण्यात आली आहे. एस. जयशंकर यांनीही अनेकदा या भूमिकेचा जाहीर कार्यक्रमांमधून पुनरुच्चारही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा पाकिस्तान दौरा व या दौऱ्यादरम्यान अवघ्या २० सेकंदांसाठी त्यांची शरीफ यांच्याशी झालेली भेट याबाबत चर्चा सुरू झाली आहे.