पीटीआय, नोम पेन्ह
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांची भेट घेतली. या वेळी उभय नेत्यांमध्ये ताज्या घडामोडी, अण्वस्त्र वापराच्या धोक्याबाबतची चिंता आणि रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठीच्या मार्गाबाबत चर्चा झाली.असोसिएशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स (एएसईएएन-आसियान) आणि भारताच्या परिषदेसाठी जयशंकर हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह कंबोडियात आले आहेत. कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह येथे ही भेट झाली.
जयशंकर यांनी ‘ट्वीट’ केले, की युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशी रशिया-युक्रेन संघर्षांच्या ताज्या घडामोडींविषयी चर्चा झाली. तसेच धान्यपुरवठा व अण्वस्त्र वापराचा धोका आदी मुद्दय़ांवर चर्चा झाली.उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ १७ व्या ‘आसियान’-भारत शिखर परिषदेत सहभागी होणार आहे. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी या भेटीविषयी माहिती देताना ‘ट्वीट’ केले, की आम्ही उभय देशांतील सहकार्य, रशियाविरुद्ध सुरू असलेला संघर्ष संपवण्यासंदर्भात चर्चा केली. रशियाने युक्रेनमधील आपले सैन्य तातडीने मागे घ्यावे व जीवघेणे आक्रमक हल्ले थांबवून शांतता प्रस्थापित करावी, यावर मी भर दिला. जागतिक अन्नसुरक्षेच्या मुद्दय़ावरही आम्ही चर्चा केली.
युक्रेन- रशिया संघर्ष हा वाटाघाटींनी सोडवला जावा, अशी भारताची भूमिका आहे. फेब्रुवारीत हा संघर्ष सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे.
आसियान-भारत संबंधांची ३० वर्षे
आसियान-भारत संबंधांना यंदा ३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे वर्ष ‘आसियान-भारत मैत्री वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना या आंतरराष्ट्रीय संघटनेत आग्नेय आशियातील ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम आदी देश आहेत.