यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा विजयी अश्वमेघ ९व्या सामन्यातही अपराजित आहे. त्यामुळे या निर्भेळ यशासह टीम इंडिया बुधवारी न्यूझीलंडचा सेमीफायनलमध्ये सामना करणार आहे. या विजयांमध्ये मोलाची भूमिका बजावणारा माजी कर्णधार विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा होत असताना आता आणखी एका कारणामुळे विराट कोहलीची चर्चा होऊ लागली आहे. कारण ब्रिटनचे पंतप्रधान व भारताचे जावई अर्थात ऋषी सुनक यांना चक्क विराट कोहलीची सही असणारी बॅट गिफ्ट देण्यात आली आहे!

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या द्विपक्षीय चर्चेसाठी ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या आमंत्रणावर त्यांनी दिवाळीच्या दिवशी सपत्नीक ऋषी सुनक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये निवांत चर्चा झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द एस. जयशंकर यांनी हे फोटो शेअर करताना एक पोस्ट एक्सवर (ट्विटर) लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटण्याचा अनुभव शेअर केला आहे.

यावेळी एस. जयशंकर यांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांना भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीनं सही केलेली बॅट भेट म्हणून दिली आहे. त्याचबरोबर श्रीगणेशाची एक मूर्तीही त्यांनी दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा आपण ऋषी सुनक यांना दिल्याचं जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव!’ ऋषी सुनक-अक्षता मूर्ती यांनी साजरी केली दिवाळी; निवासस्थानी केलं हिंदू बांधवांचं स्वागत…

काय लिहिलंय पोस्टमध्ये?

“पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिवाळीनिमित्त दिलेल्या आमंत्रणामुळे मी भारावून गेलो आहे. यावेळी मी पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा ऋषी सुनक यांच्यापर्यंत पोहोचवल्या. सध्याच्या काळानुरूप द्विपक्षीय संबंधांची नव्याने बांधणी करण्यासाठी भारत व ब्रिटन पुढाकार घेत आहेत. दिवाळीनिमित्त केलेल्या पाहुणचारासाठी श्रीमान व श्रीमती सुनक यांचे आभार”, असं या पोस्टमध्ये एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.

s jaishankar gifts virat kohli signed bat to rishi sunak
विराट कोहलीची सही असणारी बॅट ऋषी सुनक यांना भेट! (फोटो – एस. जयशंकर यांच्या एक्स पोस्टवरून साभार)

जयशंकर यांनी शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये ते सुनक यांच्याबरोबर त्यांच्या निवासस्थानी उभे असल्याचं दिसत आहे. यावेळी सुनक यांच्या हातात विराट कोहलीनं सही केलेली बॅटही दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये जयशंकर व ऋषी सुनक हे सपत्नीक बसलेले दिसत आहेत.

Live Updates
Story img Loader