India Pakistan Relations: भारत-पाकिस्तान संबंध या दोन्ही देशांच्या जन्मापासूनच तणावपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तानच्या हद्दीतून भारतात दहशतवादी कारवाया होत असल्याचे असंख्य पुरावे आजवर समोर आले आहेत. मात्र, पाकिस्तानमधून या कारवायांवर कोणताही आवर घातला जात नसल्याचं वारंवार दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं सातत्याने पाकिस्तान सरकारच्या बोटचेपी भूमिकेवर परखडपणे भाष्य केलं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच यासंदर्भात नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले एस. जयशंकर?

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर शुक्रवारी दिल्लीत एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान व बांगलादेश या देशांमधील घडामोडी व भारतातील दहशतवादी कारवाया यासंदर्भात भाष्य केलं. पाकिस्तानशी अव्याहतपणे संवाद ठेवण्याचा काळ आता संपला असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“पाकिस्तानशी अखंडपणे संवाद चालू ठेवण्याचा काळ आता संपला आहे. कोणत्याही क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच. कोणत्याही कृतीचे परिणाम असतातच. जम्मू-काश्मीरचा मुद्दा असेल, तर आता कलम ३७० हटवण्यात आलं आहे. त्यामुळे आता असा प्रश्न आहे की आपण पाकिस्तानशी कोणत्या प्रकारचे संबंध यापुढे कायम ठेवायचे?” असं म्हणत एस. जयशंकर यांनी यापुढे पाकिस्तानबाबत कोणतीही नरमाईची भूमिका घेतली जाणार नाही, असे संकेत दिले.

“भारत उत्तर देणार”

दरम्यान, यावेळी एस. जयशंकर यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कारवाईला भारत उत्तर देईल, असं स्पष्ट केलं. “मला हे म्हणायचं आहे की भारताची कृती आता इतरांवर अवलंबून नसेल. घडणारी घटना किंवा घडामोडी सकारात्मक असोत किंवा नकारात्मक असोत, काहीही असलं, तरी भारत उत्तर देणार”, असं जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे.

विश्लेषण : बलुचिस्तानात रक्तरंजित हल्ले का होत आहेत? तेथे पाकिस्तान सरकार इतके हतबल कसे?

एस. जयशंकर यांची परखड भूमिका

याआधीही परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानबाबत बोलताना त्यांची परखड भूमिका स्पष्ट केली होती. “पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार दहशतवादाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पाकिस्तानमध्ये जवळपास एखाद्या उद्योगासारखा दहशतवाद फोफावला आहे. भारत सध्या अशा कोणत्याही गोष्टी खपवून घेण्याच्या मनस्थितीत नाही”, असं एस जयशंकर याआधी म्हणाले होते. सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया करून भारताला आपल्या अटी मान्य करायला लावायचा अशीच पाकिस्तानची रणनीती राहिली असून भारतानं त्यांचे हे डावपेच हाणून पाडले आहेत, असंही एस. जयशंकर यांनी नमूद केलं आहे.

बांगलादेशातील परिस्थितीवर भाष्य

दरम्यान, परराष्ट्रमंत्र्यांनी बांगलादेशमधील राजकीय परिस्थितीवरही यावेळी भाष्य केलं. “बांगलादेशमध्ये जे सरकार येईल, त्यांच्याशी भारत सरकार चर्चा करेल हे साहजिकच आहे. शेजारी देशांशी आपापसांत काही ना काही समस्या असतातच. मला असा देश दाखवा, ज्याचे शेजारी राष्ट्रांमुळे काही अडचणींचा सामना करावा लागत नाही?” असा सवालही जयशंकर यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign minister s jaishankar on pakistan era of uninterrupted dialogue with them is over pmw