केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिका-पाकिस्तानमधील संबंधांवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. पाकिस्तानशी असलेल्या संबंधांमुळे अमेरिकेचा कोणताही फायदा झाला नसल्याचं ते म्हणाले आहेत. “या संबंधांतून ना पाकिस्तानचं हित झालं आहे, ना अमेरिकेचा फायदा झाला आहे,” असं एस जयशंकर म्हणाले आहेत. रविवारी वॉशिंग्टनमध्ये भारतीय-अमेरिकी समुदायासाठी आयोजित कर्यक्रमात ते बोलत होते.
एस जयशंकर यांना अमेरिकेने पाकिस्तानला एफ-१६ विमानांच्या ताफ्यासाठी ४५० दशलक्ष डॉलर्सचं पॅकेज दिल्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध असे आहेत, ज्यामधून ना पाकिस्तानला फायदा होत आहे, ना अमेरिकेचे हित होत आहे असं म्हटलं.
हेही वाचा – राजस्थानमध्ये ९० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर अशोक गेहलोतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आता तर…”
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीदेखील अमेरिकेच्या सुरक्षा सचिवांकडे हा मुद्दा उपस्थित केला असून, चिंता व्यक्त केली आहे. “या संबंधाचे काय फायदे आहेत आणि त्यातून काय फायदा होतो याचा विचार अमेरिकेने करायला हवा,” असा सल्ला एस जयशंकर यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले “एकीकडे दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी आपण हे करत आहोत असं सांगायचं आणि दुसरीकडे एफ-१६ सारखी लढाऊ विमानं कुठे आणि कशासाठी दिली जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अशो गोष्टी सांगून तुम्ही इतरांना मूर्ख बनवत नाही आहात”.
“अमेरिकेची धोरणं तयार करणाऱ्यांशी बोलण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच त्यांना ते काय करत आहेत हे दाखवून देईन,” असंही ते म्हणाले.