Donald Trump Wins US Elections: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प विराजमान होणार हे निश्चित झालं आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये अमेरिकेतलं हे सर्वाधिक चर्चिलं गेलेलं सत्तांतर पाहायला मिळणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून जागतिक महासत्तेचं हस्तांतर रिपब्लिक पक्षाकडे होणार आहे. पण त्याहून जास्त चर्चेची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे त्या जागतिक महासत्तेचं प्रमुखपद पुन्हा एकदा आलं आहे. जगभरात आता अमेरिकेचं धोरण कसं असेल? कोणत्या देशाबाबत काय भूमिका असेल? आर्थिक व लष्करी क्षेत्रांबाबत अमेरिकेचा काय रोख असेल? आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका कोणती भूमिका घेईल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण भारताला अमेरिकेची चिंता नसल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत आयोजित आदित्य बिर्ला स्कॉलरशिप कार्यक्रमात जयशंकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी हार्वर्ड विद्यापीठाचे प्राचार्य व राजकीय तत्वज्ञ मायकल जे. सँडल हेदेखील उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय संबंधांवर भाष्य करताना एस. जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी येण्याबाबत भारताची भूमिका मांडली.
काय म्हणाले एस. जयशंकर?
परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी बोलताना अमेरिकेतील सत्तांतराबाबत आंतरराष्ट्रीय वर्तुळातून व्यक्त होणारी अनिश्चितता व भीता याबाबत भाष्य केलं आहे. “मला याची कल्पना आहे की आज जगभरातले देश अमेरिकेबाबत काळजीत आहेत. आपण हे मान्य करायलाच हवं. पण आपण त्यापैकी एक नाही आहोत”, असं जयशंकर म्हणाले. “निकालांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी उचललेल्या पहिल्या तीन फोन कॉल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश होता”, असंही यावेळी जयशंकर यांनी नमूद केलं.
समोरच्या बाकावरून : आता निवडणुकीचे ट्रम्प प्रारूप?
भारत-अमेरिका संबंधांवर काय परिणाम?
यावेळी जयशंकर यांना डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येण्यामुळे भारत-अमेरिका संबंधांवर कोणते परिणाम होतील? अशी विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी नकारात्मक परिणामांची शक्यता फेटाळून लावली. “खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी येणाऱ्या अनेक प्रमुखांशी चांगले संबंध ठेवले आहेत. अतिशय स्वाभाविक पद्धतीने ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी असणारे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करतात”, असंही जयशंकर म्हणाले.
आर्थिक धोरणांना प्राधान्य दिल्याचा परिणाम!
दरम्यान, जगभरातल्या देशांचं लक्ष सध्या भारताकडे असून भारताच्या धोरणाचं कौतुक केलं जाण्यामागे आपण आर्थिक धोरणांवर केंद्रीत केलेलं लक्ष कारणीभूत असल्याचं जयशंकर म्हणाले. “आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण एकमेकांना फक्त लष्करी किंवा राजकीय सामर्थ्याच्या आधारावर जोखत नसून तंत्रज्ञान, आर्थिक क्षमता, मनुष्यबळ आणि सामाजिक सुधारणा हे मुद्देही महत्त्वाचे मानले जातात. कोणताही देश एकाच क्षेत्रातील सामर्थ्याच्या जोरावर विकसित होऊ शकत नाही”, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी भूमिका मांडली.