Foreign tourists In Pahalgam: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका नेपाळी पर्यटकाचाही समावेश होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या चार दिवसांमध्ये अनेकांनी आपला दौरा अर्धवट सोडत घराची वाट धरली आहे.
दरम्यान, दहशतवादी हल्ला होऊनही काही परदेशी पर्यटकांनी पहलगामला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर व भारताबाबत बोलताना काही परदेशी पर्यटकांनी भारताचे सौंदर्य पाहायचे आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.
पहलगामला आलेल्या रेनाटा या क्रोएशियन पर्यटकाने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “नुकतेच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे ऐकले होते, तरी आम्ही येथे येण्याचा निर्णय घेतला. आम्हाला तुमचा देश पहायचा होता, आम्हाला लोकांना भेटायचे होते, तुमच्या देशाचे सौंदर्य पहायचे होते. येथे भेट दिल्याचे आम्हाला समाधान आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “आज मी तुमच्याशी बोलत आहे, तेव्हा मला खूप वेदना होत आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबांबद्दल सहानुभूती आहे. तो कोणत्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारा असो, या हल्ल्यात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या वेदना मला जाणवत आहेत.”
“भारतीय लोकांमध्ये जो राग आहे तो जगभर आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेशही पाठवले आहेत. या भयानक दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल”, असेही पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमात बोलताना म्हणाले.