पीटीआय, डेहराडून
उत्तराखंडमधील नैनिताल येथील जंगलात आगीच्या ज्वाला भडकल्या आहेत. रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी भडकलेल्या आगीचे लोट आता नैनितालमधील हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागासह लष्कराचे जवान आणि हवाई दल शर्थीचे प्रयत्न करत आहेत. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून आगीवर पाण्याचा मारा केला जात आहे.
वाढत्या तापमानामुळे गेल्या दोन दिवसांत उत्तराखंडमधील जंगलात ३१ वणवे पेटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठी आग नैनितालजवळील जंगलात भडकली आहे. ही आग हायकोर्ट कॉलनीतील घरे आणि पाइन्सपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लष्करी छावणीच्या जवळ आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने लष्कर व हवाई दलाची मदत घेतली. अग्निशमन कार्यात मदत करण्यासाठी ‘एमआय-१७ व्ही ५’ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले. या हेलिकॉप्टरने नैनी आणि भीमताल तलावातील पाणी बांबीच्या बादलीतून गोळा केले आणि ते पाइन्स, भूमिधर, ज्योलीकोट, नारायण नगर, भवली, रामगड आणि मुक्तेश्वर भागातील जळत्या जंगलांवर ओतले, अशी माहिती वन विभागाने दिली.
आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. दरम्यान, या आगीमुळे हायकोर्ट कॉलनीतील रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला.