उत्तर प्रदेशमध्ये पोलीस एन्काउंटर्सची संख्या वाढली आहे. पोलीस आपलं एन्काउंटर करतील या भीतीने अनेक गुन्हेगार पोलिसांसमोर आत्मसमर्पण करू लागले आहेत. मुजफ्फरनगर येथील एका मोटरसायकल चोरांच्या टोळीतल्या सदस्याने जवळच्या मन्सूरपूर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं आहे. या चोराचं नाव अंकूर उर्फ राजा असं आहे. आत्मसमर्पण करण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जाताना त्याने हातात एक छोटा फलक घेतला होता. त्यावर लिहिलं होतं, “मला माफ करा योगीजी, माझ्याकडून चूक झाली.”
माध्यमांशी बोलताना मन्सूरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक म्हणाले की, एन्काउंटरच्या भीतीने हा आरोपी गावचे सरपंच आणि कुटुंबासमवेत पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याने माफी मागितली आणि प्रतिज्ञा केली की तो पुन्हा कोणताही अपराध करणार नाही. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न (भादंवि कलम ३०७) आणि दरोडा (भादंवि कलम ३९०) यासह चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आणि आरोपींच्या टोळीचा सामना झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपीने हे पाऊल उचललं. खतौलीचे पोलीस अपअधीक्षक रवीशंकर मिश्रा म्हणाले की, “कुविख्यात टोळीतील दोन सदस्यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्यापैकी एकजण पळून जाण्यात सफल ठरला. आम्ही आरोपींकडून तीन मोटरसायकल आणि अवैध शस्त्रं जप्त केली आहेत.”
हे ही वाचा >> बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण, राज ठाकरे की एकनाथ शिंदे? संजय राऊत म्हणाले…
मीडिया रिपोर्ट्सनुसार २०१७ पासून आतापर्यंत योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये ९,००० हून अधिक एन्काउंटर झाले आहेत.