Akash Anand Apologizes to Mayawati: बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी मार्च महिन्यात त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची पक्षाच्या समन्वयक पदावरून हकालपट्टी केली होती. मागच्या वर्षी आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून जाहिर केल्यानंतर अचानक त्यांना पायउतार केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र आता आकाश आनंद यांनी मायावती यांची जाहिररित्या माफी मागितली आहे. एक्सवर एक पोस्ट शेअर करत मायावतीच आपल्या गुरू आणि आदर्श असल्याचे आकाश आनंद यांनी जाहिर केले. तसेच बहुजन समाज पक्षात पुन्हा काम करण्याची संधी मिळावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

आकाश आनंद यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांनी लिहिले, “बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या, राज्यसभा आणि लोकसभेच्या अनेकवेळा खासदार बनलेल्या कु. मायावती यांनाच मी एकमात्र राजकीय गुरू आणि आदर्श मानतो. आज मी शपथ घेतो की, बहुजन समाज पक्षाच्या हितासाठी मी सर्व नातीगोती बाजूला ठेवतो. विशेष म्हणजे माझ्या सासरच्या मंडळीना दूर ठेवून पक्षकार्यात बाधा बनू देणार नाही.”

आकाश आनंद यांनी पुढे लिहिले, “एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या एका एक्स पोस्टबाबतही मी माफी मागतो. त्या पोस्टमुळे आदरणीय बहनजी मायावती यांनी मला पक्षातून काढून टाकले होते. यापुढे राजकीय निर्णय घेताना मी कोणत्याही नातेवाईकाचा किंवा सल्लागाराचा सल्ला घेणार नाही, हे जाहीर करतो.”

याशिवाय पक्षातील ज्येष्ठांचा आदर राखून त्यांनाही यथोचित मानसन्मान देईल, असाही शब्द आकाश आनंद यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे.

पक्षात परत घेण्याची विनंती

मायावती यांनी चुका पोटात घालून पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्यावी, असे आर्जव आकाश आनंद यांनी केले आहे. “मी माझ्या सर्व चुकांबद्दल माफी मागतो आणि मला पक्षात पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळावी, अशी विनंती करतो. यासाठी मी सदैव मायावती यांचा आभारी राहिल. पक्षाला, आदरणीय मायावती यांच्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाला ठेच लागेल, अशी कोणतीही चूक यापुढे करणार नाही”, असेही आकाश आनंद यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

सासऱ्यामुळे झाली होती कारवाई

आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ हे मायावतींच्या नावाचा दुरुपयोग करून स्वतःच्या खासगी लाभांसाठी मायावतींच्या नावाचा वापर करत होते, त्यामुळे मायावतींनी आकाश आनंद यांच्यावर कारवाई केली होती, असे सांगितले जात होते.