पीटीआय, विजयवाडा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांना भ्रष्टाचाराबद्दल धारेवर धरल्यानेच चंद्राबाबू नायडू यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली, असा आरोप तेलुगु देशमचे नेते केसनी चिन्नी यांनी केला आहे. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस जनतेचे पैसे लुटत आहे. अशावेळी त्यांना प्रश्न विचारल्यानेच कारवाई करण्यात आली अशी टीका तेलुगु देशमच्या नेत्यांनी केली आहे.
आंध्र प्रदेशच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याची टीकाही पक्षाने केली आहे. नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ हैदराबाद येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी आंध्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याखेरीज सोमवारी आंध्रमध्ये ठिकठिकाणी तेलुगु देशमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. चित्तूर जिल्ह्यात एका बसवर दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून अटकेचा निषेध केला.
राजमहेंद्रवरम कारागृहात रवानगी
राजमहेंद्रवरम (आंध्र प्रदेश) : तेलुगु देशमचे सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू यांना येथील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे. कोटय़वधी रुपयांच्या कौशल्य विकास महामंडळ घोटाळाप्रकरणी विजयवाडा न्यायालयाने ७३ वर्षीय चंद्राबाबू नायडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
न्यायालयाने नायडू यांना घरचे जेवण तसेच विशेष खोली देण्यास अनुमती दिली आहे. चंद्राबाबू यांच्यासमवेत त्यांचे पुत्र नारा लोकेश हे कारागृहापर्यंत होते. नायडू यांच्यावरील आरोप पाहता त्याची २४ तासांत चौकशी पूर्ण करणे कठीण असल्याचे आदेशात म्हटले आहे. शनिवारी पहाटे नायडू यांना अटक करण्यात आली आहे.