१९८४ साली सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे निवृत्त पोलीस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. गोव्यात पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना ज्युलिओ रिबेरो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाबाबत त्यांची भूमिका मांडली. या विधानामुळे भारतीय जनता पक्ष नाराज झाला असून भाजपाकडून रिबेरोंवर टीका करण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
ज्युलिओ रिबेरो मंगळवारी गोव्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानमधील हिंदू व ख्रिश्चन समुदायाच्या परिस्थितीवर बोलतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर परखड भाष्य केलं. “पाकिस्तानमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन समुदायाला दुय्यम नागरिक म्हणून वागणूक मिळत आहे. तीच परिस्थिती भारतातही निर्माण होईल की काय? अशी भीती मला वाटतेय”, असं विधान रिबेरो यांनी या कार्यक्रमात केलं.
“केरळमधील ख्रिश्चन समुदायाला चुचकारण्याचा प्रयत्न”
नाताळाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत ख्रिश्चन समुदायातील काही मान्यवरांशी संवाद साधला. यासंदर्भात बोलताना ज्युलिओ रिबेरो यांनी मोदी केरळमध्ये मोठ्या संख्येनं असणाऱ्या ख्रिश्चन समुदायाला चुचकारण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत मांडलं. “त्यांच्यातील एक बिशप मोदींच्या या प्रयत्नांसमोर राजी झाले. मला वाटतंय की एक बिशप मोदींच्या भूमिकेशी सहमत झाले म्हटल्यावर इतर बिशपही सहमत होतील. मोदी नेमकं काय करू पाहातायत हे पाहावं लागेल”, असं रिबेरो म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांचं रशिया भेटीचं निमंत्रण
“अगदी आपल्या मित्रांमध्येही ही बाब लपून राहिलेली नाही की मोदी सांगतात त्यातल्या अनेक गोष्टी या फक्त मतांसाठी असतात. मला आशा आहे की ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांनी दिलेला संदेश हा त्यांच्यात घडून आलेल्या हृदयपरिवर्तनामुळे असावा. तसं असेल, तर ती एक चांगली बाब म्हणावी लागेल. पण मला शंका आहे. कारण मूळ हेतू हा भारताचा भगवा पाकिस्तान करणं आहे”, असं मोठं विधान रिबेरो यांनी यावेळी केलं.
भाजपाची नाराजी, रिबेरोंवर टीकास्र
दरम्यान, रिबेरो यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद भाजपामध्ये उमटले आहेत. गोवा भाजपाचे प्रवक्ते गिरिराज पै वर्नेकर यांनी यावर बोलताना रिबेरोंवर आगपाखड केली. “रिबेरोंचं भारत व पाकिस्तानची तुलना करणारं विधान हे फक्त अस्वीकारार्हच नाही, तर आपल्या महान देशानं आत्तापर्यंत मिळवलेल्या अनेक यशांचा आणि मूल्यांचा अवमान करणारं आहे. ‘पाकिस्तानचं भगवेकरण’ असे शब्द वापरून ते त्यांच्या विचारसरणीविरोधातील सरकार सत्तेत आल्याचा रागच व्यक्त करत आहेत. एका माजी पोलीस अधिकाऱ्यानं फक्त सरकारवर टीका करण्यासाठी देशाचा अवमान करणं चुकीचं आहे”, असं वर्नेकर म्हणाले.
यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी इंडियन एक्स्प्रेसनं ज्युलिओ रिबेरोंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून संदेश किंवा फोन कॉल्सला कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.