अफगाणिस्तानच्या माजी खासदार मुर्सल नबीजादा आणि त्यांच्या सुरक्ष रक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्सल या काबूलमधील आपल्या घरी असताना रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. नबीजादा या अमेरिकेच्या समर्थक सरकारमध्ये खासदार होत्या. तालिबानने ऑगस्ट २०२१ मध्ये गनी सरकारला सत्तेतून हाकलून लावत अफगाणिस्तानची सत्ता काबिज केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद जारदान यांनी सांगितले की, नबीजादा या त्यांच्या सुरक्षा रक्षकांसोबत आपल्या घरीच होत्या. दोघांचीही घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रविवारच्या रात्री हा हल्ला झाला. या हल्ल्यात नबीजादा यांचा भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

शेवटपर्यंत अफगाणिस्तानमध्येच राहिल्या नबीजादा

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अब्दुल गनी हे देश सोडून पळाले होते. मात्र नबीजादा यांनी शेवटपर्यंत अफगाणिस्तान सोडला नाही. देश सोडून जाण्यास त्यांनी विरोध केला होता. आणखी माजी खासदार मरियम सोलेमनखिल यांनी ट्विट करत सांगितले की, नबीजादा ही अफगाणिस्तानची एक धाडसी मुलगी होती. आपल्या विचारांवर ठाम आणि ध्येयाने झपाटलेली अशी ती होती. संकटांसमोरही ती डगमगता आजवर उभी राहिली. मरियम यांनी सांगितले की, अफागाणिस्तान सोडण्याची संधी नबीजादाला मिळाली होती. तरिही देशात राहून लोकांसाठी लढण्याचा निर्णय तिने घेतला होता.

कोण आहेत नबीजादा?

नबीजादा या फक्त ३२ वर्षांच्या होत्या. २०१८ मध्ये त्या काबूलमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या देखरेखेखाली सरकार असताना महिलांना काम करण्याची संधी मिळत होती. अनेक महत्त्वाच्या पदावर महिला पोहोचल्या होत्या. काही न्यायाधीश, पत्रकार आणि राजकीय नेत्या बनल्या होत्या. मात्र तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यापासून आता महिलांवर संकट ओढवले असून कर्तुत्वान महिलांना देश सोडून जावे लागत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former afghan mp mursal nabizada shot dead in kabul kvg