पीटीआय, चेन्नई
माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मानाभन यांचे चेन्नईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांनी ३० सप्टेंबर २००० ते ३१ डिसेंबर २००२ या कालावधीत लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. जनरल पद्मानाभन यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांची मुले अमेरिकेत असून ते भारतात येण्यासाठी निघाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील.
जनरल पद्मानाभन यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तोफखाना ब्रिगेड आणि माउंटन ब्रिगेड यांचे नेतृत्व केले होते. त्यांनी १५ कोअर कमांडर म्हणून बजावलेल्या सेवेसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा : सिद्धरामय्या यांना न्यायालयाचा दिलासा; २९ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश
जनरल पद्मानाभन यांचा जन्म ५ डिसेंबर १९४० रोजी केरळमधील त्रिवेंद्रम येथे झाला. डेहराडूनमधील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (आरआयएमसी) आणि पुण्यातील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (एनडीए) या लष्करी शैक्षणिक संस्थांचे ते विद्यार्थी होते. इंडियन मिलिटरी अॅकॅडमीमधून (आयएमए) शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते १३ डिसेंबर १९५९ रोजी तोफखान्याच्या रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या दिमाखदार कारकिर्दीमध्ये अनेक प्रतिष्ठित जबाबदाऱ्यांचा समावेश होता, असे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.