नवी दिल्ली : बिहारमधील महाराजगंज मतदारसंघाचे ‘राजद’चे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दुहेरी खून खटल्यात दोषी ठरवले. याप्रकरणी आतापर्यंत चाललेला खटला म्हणजे ‘आपल्या न्यायालयीन यंत्रणेचा अपवादात्मक वेदनादायक भाग’ असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. सिंह यांना कनिष्ठ न्यायालयाने आणि पाटणा उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले होते.
हे प्रकरण १९९५ मधील आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवण्याचे हे दुर्मीळ प्रकरण आहे. न्या. संजय किशन कौल, न्या. अभय ओक आणि न्या. विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. पुरावे नष्ट करण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
प्रकरण काय? मार्च १९९५मध्ये सरण जिल्ह्यातील छपरा येथे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करून परतणाऱ्या तिघांवर प्रभुनाथ सिंह यांनी मत न दिल्याच्या रागातून गोळीबार केला. त्यांत तिघे जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी सिंह यांना पाटणा उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले होते.